मि. इंडिया पार्थसारथी भट्टाचार्य यांची शरीरसौष्ठव क्षेत्रातील प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि समर्पण व एकनिष्ठता आदर्शवत होती.
त्यांच्या निधनामुळे समस्त शरीरसौष्ठव क्षेत्राला मोठा धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. ‘आम्ही तुम्हाला मिस् करतोय पार्थोदा’, अशा शब्दात बेळगावचे नामवंत शरीरसौष्ठवपटू मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारताचे ख्यातनाम ज्येष्ठ शरीरसौष्ठवपटू पार्थसारथी भट्टाचार्य यांचे कोलकत्ता येथे कोरोनामुळे निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असणाऱ्या 62 वर्षीय पार्थसारथी भट्टाचार्य यांनी तब्बल आठ वेळा मिस्टर इंडिया हा किताब हस्तगत केला होता. बेळगावचे नामवंत शरीरसौष्ठवपटू मि. इंडिया सुनील आपटेकर यांचे ते गुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सुनील आपटेकर यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त करून पार्थोदा यांना श्रद्धांजली वाहिली. पार्थसारथी भट्टाचार्य माझे गुरु होते असे सांगून त्यांच्याबद्दल बोलताना आपटेकर म्हणाले की, आम्हा शरीरसौष्ठवपटूंसाठी पार्थोदा स्फूर्तिस्थान होते. शरीरसौष्ठव क्षेत्रातील त्यांची मेहनत घेण्याची पद्धत समर्पण आणि एकनिष्ठ वृत्ती हे गुण घेण्यासारखे होते त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो.
एकेकाळी मनोहर आईच सरांनी त्यांना सांगितले होते की तू बॉडीबिल्डर बनणार नाहीस. मात्र खडतर मेहनत घेण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर फार थोडा शरीरसौष्ठवपटू झाले आणि आठ वेळा त्यांनी मिस्टर इंडिया हा किताब देखील हस्तगत केला.
प्रारंभी नौदलात सेवा बजावत असताना त्यांनी चार वेळा मिस्टर इंडिया किताब मिळाला त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले आणि रेल्वेत आल्यानंतर त्यांनी पुन्हा चार वेळा मिस्टर इंडिया किताब पटकाविला. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असणारे पार्थसारथी देखणे आणि पिळदार शरीरयष्टीचे असल्यामुळे त्यांनी एका चित्रपटात नायकाची भूमिका देखील केली होती. त्यांच्या निधनामुळे समस्त शरीरसौष्ठव क्षेत्राला मोठा धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पार्थोदा यांच्या शरीरसौष्ठवाच्या पोझेस अत्यंत देखण्या व लाजवाब असायच्या असे सांगून ‘आम्ही तुम्हाला मिस् करतोय पार्थोदा’ अशा शब्दात सुनीला आपटेकर यांनी पार्थसारथी भट्टाचार्य यांना श्रद्धांजली वाहिली.
गेल्या कांही दिवसात निधन पावलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड याच्यासह रेल्वेचा शरीरसौष्ठवपटू मनोज लखन, जी.एकंबरम आणि गुजरातचा अनेक शरीरसौष्ठवपटू या चार शरीरसौष्ठवपटूंना देखील सुनील आपटेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.