कॅम्प येथील सेंट मेरीज हायस्कूलच्या 2011 -12 सालच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून गरजू लोकांना मोफत जेवण पुरविण्याची ‘मिशन -फाईट हंगर’ हा उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत दररोज अन्नदान करण्याबरोबरच आज शनिवार आणि उद्या रविवारी 1500 पॅकेट जेवण आणि 2000 बॉटल पाण्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
‘मनुष्यातील देवाची पूजा करा’ हे बोधवाक्य असणाऱ्या सेंट मेरीज हायस्कूलच्या 2011 -12 सालच्या बॅचमधील एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी समाजाचे आपण कांहीतरी देणे लागतो या दृष्टिकोनातून गरजू लोकांना मोफत जेवण पुरविण्याचा ‘मिशन -फाईट हंगर’ हा उपक्रम सुरू केला आहे.
कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या काळात गरीब गरजू लोकांचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत या उद्देशाने शाळेच्या बोधवाक्याला अनुसार सेंट मेरीज हायस्कूलच्या 12 ते 13 विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अन्नदानाचा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आठवड्यातील पाच दिवस दररोज दुपारचे जेवण आणि शनिवार-रविवारी दोन्ही वेळचे जेवण गरीब गरजू लोकांपर्यंत पोचविण्याचे ठरविण्यात आले आहे.
सदर उपक्रमांतर्गत सेंट मेरीज शाळेच्या 2011-12 या बॅचच्या विध्यार्थीकडून सामाजिक बांधिलकी जपताना गेल्या चार दिवसापासून दररोज 700 पॅकेट जेवण आणि 1000 बाटल्या पाण्याचे मोफत वितरण केले जात आहे. केएलई हॉस्पिटल, बीम्स हॉस्पिटल, लेक ह्यू हॉस्पिटल या ठिकाणचे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातलग तसेच शहरात बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांना तसेच गरजू लोकांसह रस्त्यावरील भिक्षुकांना सेंट मेरीजचे माजी विद्यार्थी जेवणाच्या पाकिटांचे वाटप करतात.
सेंट मेरीजच्या या माजी विद्यार्थ्यांनी प्रारंभी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. मात्र कालांतराने अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करून त्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. शनिवार आणि रविवारी संपूर्ण लाॅक डाऊन असल्यामुळे आज शनिवारी दुपारी या विद्यार्थ्यांनी 1500 पॅकेट जेवण आणि 2000 बॉटल पाण्याचे गरजुंमध्ये मोफत वितरण केले.
आज रात्री देखील हा उपक्रम राबविला जाणार असून सदर उपक्रमास आर्थिक अथवा साहित्याच्या स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्यांनी 917676674727 (रितेश अष्टेकर) या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा गुगल पे /फोन पे करावे असे आवाहन सेंट मेरीज हायस्कूलच्या 2011 -12 सालच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी केले आहे.