लक्ष्मीटेक येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये काल सोमवारी 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याची निदान झाले असून बाधितांमध्ये 3 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.
मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दोन दिवसापूर्वी म्हणजे गेल्या शनिवारी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश होता, तर तत्पूर्वी गेल्या शुक्रवारी एकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.
यात भर म्हणून काल सोमवारी आणखी 6 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अनुक्रमे 30, 23 व 60 वर्षे वयाच्या महिला तसेच 52, 79 व 60 वर्षे इतक्या वयाच्या पुरुषांचा समावेश आहे. या पद्धतीने मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसात एकूण 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी 4 महिला आणि 6 पुरुष आहेत. या सर्व बाधितांना उपचारासाठी कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्य खात्याने कोरोनाग्रस्तांवर वैद्यकीय उपचार करण्यासह चांचण्या वाढविल्या आहेत. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना काॅरंटाईन केले जात आहे. ज्या कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींवर विलगीकरण कक्षात उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी सध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामध्ये आता मिलिटरी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे.