खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कापोली माचीगड व माणिकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
युवा समितीतर्फे तहसीलदार रेश्मा ताळीकोटी व आरोग्य अधिकारी डॉ संजीव नांद्रे यांची एका शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या 600 हुन अधिक आहे. मात्र खानापूर तालुका रुग्णालयात ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. त्यामुळे अनेकांना होम आयसोलेशन केले जात आहे. मात्र अनेकांना घरात जागा उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.
त्या ठिकाणी रुग्णाना ठेवण्याची सोय करणे गरजेचे आहे. तसेच कापोली, माणिकवाडी व माचीगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद आहेत. ती केंद्रे तातडीने सुरू करावीत आणि ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांना त्या ठिकाणी होम आयसोलेशन करावे तसेच याबाबत तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि हे केंद्रे तातडीने सुरू करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी तहसिलदार रेश्मा ताळीकोटी यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल तर आरोग्याधिकारी नांद्रे यांनी तालुका रुग्णालयात बेडची संख्या वाढविली जाईल अशी माहिती दिली निवेदन देतेवेळी युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, विनायक सावंत, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील,अनंत झुंजवडकर, ज्ञानेश्वर सनदी, मंजुनाथ चौगुले आदी उपस्थित होते.
तसेचबेकवाड येथील देशपाईक किसान सेवा केंद्र येथे ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही अशा तक्रारी वाढत असून पेट्रोल व डिझेल भरल्यानंतर एखाद्या ग्राहकाने ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कार्ड दिले तर रक्कम द्या असे सांगितले जात असल्याने पंपावर वादावादी होत आहे याकरता या पेट्रोल धारकाला ऑनलाइन पेमेंट करण्याची सूचना करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.