बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुका हॉस्पिटलला आमदार रमेश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकार्यांना समवेत भेट देऊन कोरोनासंदर्भात तेथील कामकाजाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेप्रसंगी कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आणि त्याला रोखण्यासाठी लॉक डाऊन कालावधी वाढविण्याची गरज आमदार रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
गोकाक तालुका हॉस्पिटलला आज शनिवारी सकाळी आमदार रमेश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे कोवीड परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याप्रसंगी बोलताना आमदार रमेश जारकीहोळी यांनी हॉस्पिटलमधील बेड्सची कमतरता दूर करून कोरोनाग्रस्त रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत असे सांगितले.
कोरोनाग्रस्तांना समर्पक उपचार मिळावेत, त्याचप्रमाणे लसीकरण व्यवस्थित व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्याची सिद्धता झाली आहे. तथापि विरोधी पक्षाकडून यासंदर्भात अपप्रचार सुरू आहे.
कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारी अधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. तेंव्हा जनतेने विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये. खरेतर अपप्रचार करण्याऐवजी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी विरोधी पक्षाने सरकारला मदत केली पाहिजे. सल्ला -सूचना दिल्या पाहिजेत, असेही आमदार जारकीहोळी म्हणाले.