Saturday, January 4, 2025

/

कर्नाटकात लाखो लोक गरिबीच्या विळख्यात

 belgaum

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कर्नाटकातही परिस्थिती वेगळी नाही. या लाटेने अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे कंबरडेच मोडले आहे. कमावणारे सदस्य घरात बसले, त्यापैकी काहींना कोरोना झाला, औषधांचा खर्च वाढला, मृत्यू झाला की कमावणारा सदस्य कमी झाला आणि हातात उरलेली बाकी ही संपली अश्या विळख्यात लाखो लोक अडकले आहेत. तिसरी लाट आलीच नाही तर ठीक अन्यथा गरिबांबरोबर मध्यमवर्गीयांनाही उपासमारीचा सामना करावा लागतो.

वस्त्र आणि निवारा या गरजा आता सगळ्यांनीच बाजूला ठेवल्या आहेत. अन्न ही एकमेव मूलभूत गरज बनत आहे. मागच्या वर्षी तीन चार महिने कसेतरी काढून लोक परत कामाला लागले होते. ज्यांची कामे मागच्यावर्षी कायमस्वरूपी गेली त्यांनी छोटे मोठे उद्योग अर्थात फिरती विक्री सारख्या पर्यायांचा अवलंब केला होता, पण दुसरी लाट आली आणि सगळे उद्योग व रोजगारही घेऊन गेली अशी सर्वसामान्य कुटुंबांची अवस्था आहे.

हाताच्या पोटावर जगणारी कुटुंबे सध्या इतरांच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारी रेशन धान्य वगळता त्यांना अभावानेच दुसरी मदत मिळू शकत आहे. यामुळे एकीकडे येणाऱ्या रोगाची भीती आणि दुसरीकडे लॉकडाऊन मध्ये खायचे काय हा विचार अशा परिस्थितीत लाखो नागरिक अडकले आहेत.

तीन ते चार सदस्यांच्या छोट्या मध्यमवर्गीय कुटुंबात साधारणपणे एक व्यक्ती कमाईची मुख्य जबाबदारी घेत असते तर आणखी एकादी व्यक्ती हातभार लावत असते. कमी दर्जाचे काम करणाऱ्या अशा कुटुंबाचे दरमहा उत्पन्न जास्तीतजास्त दहा हजार असते. धान्य,दूध आणि इतर खर्च आज वाढत्या महागाईत कमीत कमी सात ते आठ हजार इतका आहे. यातच या कुटुंबात लहान मुले किंवा वृद्ध असल्यास किमान तीन ते चार हजार रुपये त्यांची औषधे आणि इतर संगोपनासाठी खर्च करावे लागतात. सध्या हा खर्च कायम आहे पण कमाईचे दरवाजे बंद झाले आहेत यामुळे ही कुटुंबे अतिशय अडचणीत आली आहेत.

आता अशा कुटुंबांना ओळखून त्या त्या विभागात त्यांना मदत करावी लागणार आहे. प्रत्येक गल्लीतील श्रीमंतांनी,युवक कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. अशा कुटुंबांच्या किमान गरजा भागवता येतील याकडे लक्ष दिल्यास त्यांना जगवता येऊ शकेल. अन्यथा या कोरोनाच्या विळख्यात अनेक कुटुंबे देशोधडीला लागण्याची भीती आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.