रामनगर तिसरा क्रॉस कंग्राळी खुर्द येथील रस्त्यासह ड्रेनेजचे काम व्यवस्थित करण्यात न आल्यामुळे याठिकाणी निर्माण झालेल्या चिखलात वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत असून या ठिकाणचे रस्त्यांचे काम देखील संथ गतीने सुरु असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कंग्राळी खुर्द गावातील रामनगर तिसरा क्रॉस या ठिकाणच्या रस्त्याचे काम गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू आहे. अलीकडे या रस्त्याशेजारी चर खोदून ड्रेनेज पाईप घालण्याचे काम सुरू असले तरी ते व्यवस्थित केले जात नाही. त्यामुळे गेल्या दहा पंधरा दिवसापासून या ठिकाणीच्या चिखल मातीमध्ये वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
परिणामी वाहन चालकासह आसपासच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सध्या पडणाऱ्या पावसामुळे तर या ठिकाणी वाहने सातत्याने अडकून पडत आहेत. ड्रेनेज पाईप घालण्याच्या खराब कामाबद्दल कंत्राटदार प्रवीण कुकडाळ यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून अरेरावीची उद्धट उत्तरे मिळत आहेत. यासंदर्भात गावकऱ्यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. त्यांनीसुद्धा कंत्राटदाराला समाज दिली असली तरी रस्त्यासह ड्रेनेज पाईप घालण्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे.
रामनगर तिसरा क्राॅस येथील रस्त्याप्रमाणेच गावातील स्मशान रोड या रस्त्याचे काम देखील अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कोरोनामुळे गावात मृतांची संख्या वाढली आहे.
अंत्यविधीसाठी हाच रस्ता वापरावा लागत असल्यामुळे या अर्धवट विकास झालेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास होत आहे. तरी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही विकास कामे लवकरात लवकर दर्जेदार पणे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.