कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रचंड संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत असल्यामुळे उपलब्ध पायाभूत आरोग्य सुविधांवर मोठा ताण पडला आहे. या परिस्थितीत विविध बिगर सरकारी संघटना आपल्यापरिने हा ताण हलका करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित शहरातील जनसेवा कोविड केअर सेंटरने युथ फॉर सेवा अर्थात सेवेसाठी युवक या चळवळीच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी एक अनोखा उपाय शोधला असून त्यांनी मोबाइल कोविड केअर सर्व्हिस सुरू केली आहे. ज्यामुळे कोरोनाग्रस्तांना त्यांच्या घरापर्यंत उपचार उपलब्ध झाले आहेत.
सध्या बहुसंख्य कोरोनाग्रस्तांचे त्यांच्या -त्यांच्या घरामध्येच आयसोलेशन झाल्यामुळे बऱ्याच जणांना योग्य औषध उपचार मिळत नाहीत. यासाठी जनसेवा मोबाईल कोविड केअर सर्व्हिस सारखी सेवा अत्यंत गरजेची होती, जी आता सुरु झाली आहे. चार सदस्यांच्या पथकाकडून ही सेवा दिली जात असून या चार जणांमध्ये एक डॉक्टर, नर्स, स्वयंसेवक आणि चालक यांचा समावेश आहे. मोबाईल कोविड केअर सर्व्हिसच्या कारमध्ये गरज भासल्यास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देखील उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
या मोबाईल सेवेसंदर्भात बोलताना डॉ. किशोर म्हणाले की, कोरोनाग्रस्त रुग्णांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन उत्तम औषधोपचार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण त्यामुळे रुग्णांचे नैतिक धैर्य उंचावण्यास मदत होणार आहे. आम्ही रुग्णांची त्यांच्यातील रोगाच्या लक्षणावरून विभागणी करून उपचार करत आहोत. रुग्ण पूर्णपणे कोरोना मुक्त व्हावा यासाठी प्रत्येक रुग्णावर कोरोना होऊन गेल्यानंतरचे उपचार व्यवस्थित होतील याची काळजी घेतली जात आहे असे सांगून सदर मोबाईल केअर उपचारासाठी डाॅ. प्रवीण यांचे सहाय्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
जनसेवा मोबाइल कोविड केअर सर्व्हिस ही सेवा दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली असून या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी 6388895701 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, युथ फॉर सेवा (वायएफएस) अर्थात सेवेसाठी युवक ही चळवळ गेल्या एप्रिल 2007 मध्ये सुरू करण्यात आली आहे. ही देशव्यापी स्वयंसेवी चळवळ युवकांना समाजसेवेसाठी प्रेरित करून त्यांना त्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करुन देत असते. शाळा निराधारांची आश्रय गृहे, सरकारी हॉस्पिटल्स आणि सामाजिक क्षेत्रातील अन्य संघटनांना अडचणीच्या काळात स्वयंस्फूर्तीने सहाय्य करणे हे वायएफएसचे ध्येय आहे.