रेमडेसिविरची अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी असल्यास संबंधित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाई करा, स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा, बेड्सची संख्या वाढवा आदी सुचना आपण जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी दिली.
बेळगाव शहरांमध्ये आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यापासून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी सरकारी व खाजगी हॉस्पिटल्समधील बेड्सची संख्या वाढवा. रुग्ण संख्येबरोबरच मृतांची संख्या देखील वाढत आहे, त्याकडेही लक्ष देऊन शहर व ग्रामीण भागात स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा. तसेच तहसिलदारांकडून त्याची अंमलबजावणी करून घ्या, अशी सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे कार्जोळ यांनी सांगितले.
रेमडेसिविरची जादा दराने विक्री करणार्या डॉक्टर आणि हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची सूचनाही केली असून बेड्स आणि ऑक्सीजन तुटवड्याच्या तक्रारींची दखल घेऊन सरकारी व खाजगी हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या वाढविण्यास सांगितले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समुदाय भवनांमध्ये लसीकरणाची आणि सरकारी वस्तीगृहामध्ये कोरोना-19 केअर सेंटर सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
ऑक्सिजनच्या बाबतीत तक्रारी वाढत आहेत तेंव्हा ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्याबरोबरच ऑक्सीजन लावण्याबाबत डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण द्या असे सांगितले आहे. बेड्सच्या समस्येबाबत बोलताना मंत्री गोविंद कार्जोळ म्हणाले की, सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ऑक्सिजन बेड्स कमी पडत आहेत. त्यासाठी लवकरात लवकर बेडची संख्या वाढविण्याची सक्त सूचना मी केली आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटल्समधील एकुण बेड्स, रिक्त बेड्सची संख्या याची माहिती वेबसाईटद्वारे जनतेला उत्तर उपलब्ध करुन देण्यास सांगितले असल्याचे कार्जोळ यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, आमदार ॲड. अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, महापालिका आयुक्त के. जगदीश आदी उपस्थित होते.