कंग्राळी खुर्द गावानजीकच्या मार्कंडेय नदी किनारी रस्त्याशेजारी केरकचरा टाकून अस्वच्छता निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने आज कंग्राळी खुर्द ग्रा. पं. सदस्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांनी रस्त्याशेजारी कचरा टाकू नये, असे आवाहन केले.
कंग्राळी खुर्द गावानजीकच्या मार्कंडेय नदी किनारी रस्त्याशेजारी केरकचर्याच्या पिशव्यांसह टाकाऊ साहित्य टाकण्याचा प्रकार सुरू आहे. आसपासच्या गावातील लोकांसह कंग्राळी खुर्द गावातील सकाळी फिरावयास जाणाऱ्या लोकांकडून हा कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी आहेत. कचऱ्याच्या पिशव्या आणि अन्य टाकाऊ साहित्यामुळे येथील मार्कंडेय नदी किनारी रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे या ठिकाणी रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. या ठिकाणी घरातील जीर्ण झालेल्या देवदेवतांच्या तसबिरीही टाकण्यात आले आहेत. रस्त्याप्रमाणे नदीच्या पात्रात मृत व्यक्तींचे कपडे, अंथरुण आदी टाकण्यात येत आहे.
यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन आज कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती सुधीर पाटील, ग्रा. पं. सदस्य कल्लाप्पा पाटील, रमेश कांबळे, प्रशांत पाटील, विनायक कमार, विनोद शिंदे, ग्रा. पं. सदस्या लता नागोजी पाटील, विना पुजारी, राधा कांबळे, रेखा पावशे, कमला पाटील आणि मधुमती पाटील यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली.
तसेच नागरिकांनी या पद्धतीने रस्त्याशेजारी कचरा न टाकता गावात फिरणाऱ्या घंटागाडीकडे कचरा सुपूर्द करावा. मृत व्यक्तींचे कपडे, अंथरुण आदी गोष्टी नदीत न टाकता त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, असे आवाहन ग्रा. पं. सदस्यांनी केले आहे.