सीमाभागाचे पालकत्व स्वीकारलेले शिवसेनेचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना प्रादुर्भाव काळातील ऑक्सीजन तुटवड्याच्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत युद्धपातळीवर ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देऊन आपली पालकाची जबाबदारी चोख बजावत असल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरासह जिल्ह्यात ऑक्सीजन कमतरता निर्माण झाली आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बेळगाव शिवसेनेने शिवसेनेचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिर येथे सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरला एकनाथ शिंदे यांनी आज तूर्तास 2 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत.उर्वरित 8 आगामी 4 दिवसांत मिळणार आहेत.
याप्रसंगी बोलताना शुभम शेळके म्हणाले की, गेल्या कांही दिवसांपासून प्रशासनाने शहरातील हॉस्पिटल वगळता सेवाभावी संस्थांना ऑक्सिजन पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे रुग्ण अक्षरशा तडफडत होते आणि आम्ही हतबल झालो होतो. मात्र त्याची माहिती मिळताच महाराष्ट्रातील शिवसेनेचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्परता दाखवून या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सोय सीमावासियांसाठी करून दिली आहे. सीमा समन्वयक मंत्री म्हणून सीमावासीयांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे असे सांगून आता सीमाभागातील मराठी माणसाकडे सरकारने जेंव्हा दुर्लक्ष केले तेंव्हा आपली पालकाची भूमिका त्यांनी चोख बजावत हे कॉन्सन्ट्रेटर्स पाठवून दिले आहे. याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे शेळके म्हणाले.
शिवसेना बेळगावचे संघटक दत्ता जाधव यांनी आपले समयोचित विचार व्यक्त करताना गेल्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सचे वाटप केले जात असल्याचे माझ्या निदर्शनास आणून देण्यात आले. ठाणे जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरच्या ठिकाणी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सचा उपयोग केला जात असल्याची माहिती मला मिळताच बेळगावातही त्यांचा वापर का केला जाऊ नये असा विचार करून मी मा. एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडे 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशिनची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन त्यांनी तूर्तास दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पाठवून दिली असून उर्वरित आठ मशीन्स येत्या कांही दिवसात उपलब्ध होणार आहेत. सदर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्यासंदर्भात पाठपुरावा केल्याबद्दल मंगेश चिवटे यांच्यासह मी शिवसेना नेते आणि सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे तसेच डॉ श्रीकांत शिंदे यांचा आभारी आहे, असे दत्ता जाधव म्हणाले.
प्रारंभी महादेव पाटील यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मशीन्स उपलब्ध करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांची थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर,सचिन गोरले,समितीचे मदन बामणे, महादेव पाटील, सागर पाटील,सुनील मुरकुटे,बाळू जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरसाठी हे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध झाले असल्यामुळे अत्यवस्थ कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत असून शिवसेनेसह मंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले जात आहेत.