वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहरातील होलसेल भाजी मार्केटची वाताहत होऊन शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत प्रशासनाला कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे होलसेल भाजी मार्केट अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांसह संबंधित सर्वांनी घेतला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या तीव्रतेमुळे एपीएमसी येथील होलसेल भाजी मार्केट शहरात भाजी मार्केट दोन ठिकाणी चालू करण्यात आले आहे. तथापि या ठिकाणी कोणत्याही आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.
परिणामी दोन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पाऊसामुळे दोन्ही भाजी मार्केटमध्ये चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे भाजी कुजून शेतकरी व व्यापाऱ्यांचे प्रचंड असे नुकसान होत आहे. यात भर म्हणून वादळी वाऱ्यामुळे दुकान गाळ्यांच्या शेडचे पत्रे उडून अनेक कामगार व व्यापारी जखमी झाले आहेत.
ही सर्व बाब प्रशासनाला रितसर कळवून सुद्धा अद्याप काहीच हालचाल अथवा कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यासाठी भाजी व्यापारी,सप्लायर्स व शेतकऱ्यांनी पुढील निर्णय होईतोपर्यंत भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे.
दरम्यान, उद्या मंगळवार दि. 18 मे रोजी दोन्ही भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय असोसिएशन घेतला आहे. तरी सर्व व्यापारी आणि सप्लायर्स याची दखल घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.