सध्याच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी निवार्याची पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज येथील जुन्या शेडची जागा झाडलोट करून स्वच्छ करण्याद्वारे अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध केली आहे.
सध्या कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदाशिवनगर स्मशानभूमीवरील ताण वाढला आहे. यात भर म्हणून सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी योग्य जागेचा अभाव निर्माण झाला होता.
याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्यासह अभिजीत चव्हाण, शंकर पाटील आदी तानाजी गल्ली गोंधळी गल्ली व गणाचारी गल्ली येथील युवा कार्यकर्त्यांनी आज रविवारी सदाशिवनगर स्मशानभूमीतील धूळ खात पडलेल्या जुन्या शेडच्या जागेत स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेला केरकचरा एकत्र गोळा केला आणि त्याची विल्हेवाट लावली.
या पद्धतीने या सर्व कार्यकर्त्यांनी आता स्मशानभूमीतील जुन्या शेडमधील निवार्याची जागा अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून दिली आहे. याकामी त्यांना महापालिकेचे अधिकारी संजय मोरे यांचे सहकार्य लाभले.
सध्याच्या संततधार पावसात सामाजिक कार्यकर्त्यांनी यापद्धतीने अंत्यसंस्कारासाठी निवार्याची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.