कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील 130 शिक्षकांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 36 शिक्षक आणि शिक्षण खात्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरीचा लाभ मिळणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांची संख्या अधिक आहे. बेळगाव जिल्ह्यात गेल्या जानेवारी महिन्यापासून 42 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी देखील कांही शिक्षक कोरोनामुळे दगावले होते. या शिक्षकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी.
कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे, अशी मागणी होत होती. याबाबत शिक्षक संघटनांकडून अनेकदा शिक्षण मंत्र्यांना निवेदनही देण्यात आले होते. कांही दिवसापूर्वी शिक्षणमंत्र्यांनी संबंधितांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते.
आपले आश्वासन पाळताना गुरुवारी शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी नियुक्तीची पत्रे वितरित केल्याची माहिती दिली. नोकरी देताना शैक्षणिक पात्रता पाहून नेमणुका करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सरकारी सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून ‘क’ श्रेणीतील प्रथम श्रेणी सहाय्यक पदापर्यंत हुद्दे देण्यात येतात. सेवेत असणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास नियमानुसार अनुकंपा आधारित नोकरी द्यावी लागते.
या नियमानुसार पहिल्या टप्प्यात 130 शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.