दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी वाजता 42 व्या राऊंड नंतर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी 4302 हजार हुन अधिक मतांनी आघाडीवर आहेत. सतीश जारकीहोळी यांना 227087 तर भाजपच्या मंगला अंगडी यांना 222785 मते पडली आहेत. जवळपास 50 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांना 55 हजार मते पडली आहेत.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी दुपारी 1:00 वाजेपर्यंत अर्ध्याहून अधिक पूर्ण झाली असून भाजप उमेदवार मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगला अंगडी यांनी प्रारंभापासूनच घेतलेली आपली आघाडी अद्याप अबाधित ठेवली होती दुपारी 1 पर्यंत त्या 5,587 मतांनी जारकीहोळी यांच्या पुढे होत्या.
टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज महाविद्यालयामध्ये कडेकोट बंदोबस्तात बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये मंगला सुरेश अंगडी (भाजप), सतीश लक्ष्मणराव जारकीहोळी (काँग्रेस) आणि शुभम विक्रांत शेळके (म. ए. समिती -अपक्ष) या तीन प्रमुख उमेदवारांसह एकूण 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज दुपारी 12:52 वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये भाजप उमेदवार मंगला अंगडी 1,88,570 मतांसह आघाडीवर होत्या. त्यांच्यामागोमाग काँग्रेसचे सतीश जारकीहोळी 1,82,983 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि शुभम शेळके 51,805 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते. थोडक्यात दुपारी 1 वाजेपर्यंत मंगला अंगडी या आपले नजीकचे प्रतिस्पर्धी सतीश जारकीहोळी यांच्यापेक्षा 5,587 मतानी आघाडीवर होत्या. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासून भाजप उमेदवार मंगला अंगडी यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. तथापि त्यांना काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी कांटे की टक्कर देत आहेत. सकाळी 11:30 पर्यंत 12,643 मतांनी आघाडीवर असणाऱ्या अंगडी यांची आघाडी जारकीहोळी यांनी दुपारी 1 वाजेपर्यंत 5,587 इतकी कमी केली होती. या दोन्ही उमेदवारांमध्ये सध्या मोठी चुरस निर्माण झाली असल्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत समर्थकांसह सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज दुपारी 12:52 वाजेपर्यंत इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत विवेक घंटी यांना 2056 मते, श्रीकांत पडसलगी यांना 1947 मते, नागाप्पा कळसन्नावर यांना 1303 मते, श्री व्यंकटेश्वर महास्वामी यांना 854 मते, महालिंगन्नावर सुरेश बसप्पा यांना 802 मते आणि गौतम कांबळे यांना 616 मते पडली होती.