बेळगाव शहरात सध्या स्मार्ट सिटी ची कामे जोरात सुरू आहेत. क्लोज डाऊन असल्यामुळे सर्वत्र वर्दळ कमी असल्यामुळे कामे करून घेतली जातात, मात्र ही कामे करत असताना स्मार्ट सिटी लिमिटेड अडचणीत आली आहे आणि वादाच्या भोवर्यात सापडली आहे.
कारण असे आहे की स्मार्ट सिटी ची कामे करून घेत असताना लहान मुलांचा बालकामगारांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असून याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्ह ने पाहणी केली असता रस्त्याच्या दुभाजकांची रंगरंगोटी करणारे कामगार बालकामगार असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यांना एका कंत्राटदाराच्या माध्यमातून पैसे देण्याचे आमिष दाखवून या कामाला जुंपण्यात आले आहे. या संदर्भातील कंत्राट घेतलेली व्यक्ती ,कंत्राट देणारे तसेच कामगारांकडून काम करून घेणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाईची गरज सध्या निर्माण झाली आहे .
कॉलेज रोडवर सुरू असलेल्या कामात सर्रास बालकामगारांचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असून स्मार्ट सिटी लिमिटेडचे संचालक शशिधर कुरेर आणि इतर अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
कोणत्याही खासगी उद्योग धंद्यात जर बाल कामगारांचा उपयोग होत असल्यास दंड बसवून कायदेशीर कारवाई केली जाते. मग आता सरकारी कामात अशी कारवाई केली जाणार का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.