बेळगावचे प्रसिद्ध उर्दू कवी व पत्रकार अब्दुससमद मयुद्दीन खानापुरी (७६) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.
सुभाष नगर येथील रहिवासी खानापुरी हे बाशीबन उर्दू शाळेच्यामुख्याध्यापकपदावरून निवृत्त झाले होते.
उर्दू शायरी व साहित्यात त्यांचे विपुल योगदान होते. ते बेलगाम उर्दू अकादमीचे सेक्रेटरी तसेच कर्नाटक उर्दू अकादमीचे सदस्य होते. त्यांनी राष्ट्रीय सहारा या उर्दू दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून तसेच सालार उर्दू वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते.
दीर्घ संशोधन करून लिहिलेल्या ‘बेलगाम : तारीख के आईने में’ या उर्दु ग्रंथात त्यांनी बेळगावचा इतिहास, बेळगांवची संस्कृती व स्वातंत्र्य लढा तसेच अन्य क्षेत्रात मुस्लिमांचे योगदान याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला होता.
या ग्रंथाचा हिंदी अनुवाद ‘बेलगाम: इतिहास के दर्पण में’ या नावाने त्यांनीच केला होता. सदर ग्रंथाचे मुद्रण झाले होते पण कोविडमुळे त्याचे प्रकाशन अद्याप झाले नव्हते. खानापूरी यांच्या निधनाने बेळगावातील उर्दू पत्रकारिता साहित्यातील एक चेहरा हरपला आहे.
खानापुरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.