हिंडलगा कारागृहातील 21 कैद्यांची मुक्तता : राज्यपालांचा आदेश
राज्यपालांच्या आदेशानुसार यंदा हिंडलगा मध्यवर्ती गृहातील 21 कैद्यांची सहानुभूतीच्या आधारावर नुकतीच मुक्तता करण्यात आली असून हे सर्व कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.
सहानुभूतीच्या आधारावर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता झालेले कैदी गेल्या मंगळवारी आपल्या घरी परतले असून ते यापुढे सामान्य नागरिकांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करणार आहेत.
दरवर्षी उत्तम वागणुकीच्या आधारावर सदर कारागृहातील दीर्घ दीर्घकाळ तसेच जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची त्यांच्या वागणुकीच्या आधारावर सुटका केली जाते.
कारागृहात उत्तम वागणुकीच्या कैद्यांची यादी शासनाकडे पाठविली जाते. मंत्रिमंडळ बैठकीत अशा कैद्याची वागणूक, त्यांचे राहणीमान आणि त्यांनी कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला याची पडताळणी करून त्यांची निवड केली जाते. त्यानंतर ती यादी राज्यपालांकडे क्षमादानासाठी पाठविली जाते. राज्यपाल अशा कैद्यांची प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन सारख्या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुक्तता करतात.
मागील दोन वर्षापासून राज्यपालांकडून सहानुभूतीच्या आधारावर हिंडलगा कारागृहातील कैद्यांची मुक्तता झालेली नव्हती. त्यामुळे जन्मठेप भोगणारे अनेक कैदी आपल्या सुटकेच्या प्रतिक्षेत होते.
या पद्धतीने राज्याच्या विविध कारागृहातील अनेक कैदी राज्यपाल यांच्या आदेशाची प्रतीक्षा करत होते. अखेर राज्यपाल वजुभाई वाला यांनी नुकताच कैद्यांचा सुटकेचा आदेश बजावला आहे. त्यामध्ये बेळगावातील 21 कैद्यांचा समावेश होता, ज्यांची मुक्तता करण्यात आली आहे.