कोरोनाला गांभीर्याने घ्या. छोट्या छोट्या गोष्टींसाठी घराबाहेर पडू नका. गर्दी करू नका. मार्गदर्शक सूचीचे पालन करा आणि जोपर्यंत प्रशासन जीवघेण्या कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली येत नाही तोपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष कोरोना योद्धा पृथ्वीसिंग यांनी समस्त नागरिकांना केले आहे.
पृथ्वीसिंग फाउंडेशनच्या माध्यमातून पृथ्वीसिंग आणि त्यांचे सहकारी गेल्या वर्षीच्या लॉक डाऊन काळापासून जनसेवा करत आहेत. विशेष करून सफाई कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या आणि तळागाळातील लोकांना मदत करण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे कार्य जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्हने पृथ्वीसिंग यांची भेट घेतली असता त्यांनी वरील प्रमाणे आवाहन केले. आपल्या फाउंडेशनच्या कार्याची माहिती देताना ते म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून आम्ही जनसेवा करत असून प्रारंभी मी 12 जणांना घेऊन पृथ्वीसिंग फाउंडेशनची नोंदणी करून अधिकृत स्थापना केली.
या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य सुरू करताना प्रारंभी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना फळं आणि ताक देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला. त्यानंतर लाॅक डाऊनचा कालावधी वाढला आणि लोकांची परिस्थिती बिकट झाली. तीन महिने लॉकडाऊन असल्यामुळे कोणताही कामधंदा सुरू नव्हता. आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. ही बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांना ताक व फळे वाटपाच्या उपक्रमा बरोबरच आम्ही गोरगरीबांसाठी कांहीतरी करायचे ठरविले. त्यानुसार खोटं वाटेल पण सुरुवातीला आम्ही जीवनावश्यक साहित्याच्या फक्त 10 किट्सचे आमच्या कॉलनीतील कामवाल्या महिलांना वाटप केले. त्यांच्याद्वारे आमच्या या उपक्रमाची जाहिरात होत गेली आणि त्यानंतर आम्ही आशा कार्यकर्त्या, पौरकार्मिक, कंत्राटी सफाई कामगार आदींना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.
कोरोनाच्या पहिल्या लाटे वेळी जे लोक कोरोनामुळे मृत झाले त्यांच्याजवळ ही कोणी जात नव्हते. त्यावेळी पीपीई किटची किंमत देखील अवाच्या सव्वा होती. मात्र एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही पृथ्वीसिंग फाउंडेशनच्या माध्यमातून 300 पीपीई किट्स खरेदी करून शहरातील सर्व स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचे वाटप केले, अशी माहिती पृथ्वीसिंग यांनी दिली. त्याचप्रमाणे विजयनगर, हिंडलगा, आंबेवाडी, तुरमुरी आदी ग्रामीण भागासह शहर आणि उपनगरात पृथ्वीसिंग फाउंडेशनने बहुसंख्य गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोट निवडणुकीनंतर कोरोनाचा उद्रेक झाला तेंव्हा मागील वर्षी माझ्यासोबत काम केलेले कार्यकर्ते यावेळी मदतीसाठी पुढे सरसावले. परिणामी प्रारंभी आमचे फक्त 12 कार्यकर्ते होते, आज या कार्यकर्त्यांची संख्या 500 झाली आहे असे सांगून यावेळी आम्ही पहिले काम काय केले तर बीम्स हॉस्पिटलमधील प्रसूती वॉर्डात व कोरोना वॉर्ड बाहेर जेवणाची सोय नव्हती तेथे पुलाव पाकीट, हॅन्ड सॅनिटायझर आणि फेस मास्कचे वाटप केले, असे त्यांनी सांगितले.
ऑक्सीजन सिलेंडर पुरवठाबाबत बोलताना पृथ्वीसिंग म्हणाले की, सुरुवातीला आमच्याकडे 12 ऑक्सीजन सिलेंडर्स होते. परंतु वाढती मागणी लक्षात घेऊन फाउंडेशनच्या माध्यमातून मी कोल्हापूरहून 40 ऑक्सीजन सिलेंडर्स खरेदी करून आणले आहेत. मात्र दुर्दैवाने मला त्या सिलेंडर्सद्वारे फक्त आठ दिवसच जनसेवा देता आली. कारण त्यानंतर प्रशासनाने खाजगी संस्थांच्या ऑक्सिजन पुरवठावर बंदी घातली. परिणामी आता आमच्याकडील ऑक्सीजन सिलेंडर्स रिकामे पडून आहेत. माझी सरकारला विनंती आहे की बिगर सरकारी संघटनांना किमान 5 ते 10 सिलेंडर्स जनसेवेसाठी वापरण्याची परवानगी दिली जावी. सध्या जी बंदी घालण्यात आली आहे ती लवकरात लवकर मागे घ्यावी, अशी मागणीही पृथ्वीसिंग यांनी केली.
शेवटी कोरोना हा अत्यंत जीवघेणा रोग असून त्याला किरकोळ समजू नका. छोट्या छोट्या गोष्टींसाठी घराबाहेर पडू नका. गर्दी करू नका. कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करा आणि जोपर्यंत प्रशासन जीवघेण्या कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणत नाही, तोपर्यंत सर्वांना हात जोडून विनंती आहे कि कोणीही घराबाहेर पडू नका, असे कळकळीचे आवाहन पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष कोरोना योद्धा पृथ्वीसिंग यांनी समस्त बेळगाववासियांना केले आहे.