ठरवल्याप्रमाणे सर्व कांही झालं तर कोरोना प्रादुर्भावा विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी बेळगाव महानगरपालिका खाजगी कंपनीच्या सहकार्याने लवकरच ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प स्थापन करणार आहे.
जिल्ह्यातील ऑक्सीजन पुरवठ्याची समस्या दूर करण्याच्या हेतूने सदर ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून सध्या तो जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात माहिती देताना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ संजय डुमगोळ म्हणाले की, सदर प्रस्तावावर अद्याप चर्चा सुरू असून अल्पावधीत त्याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच बेळगाव महापालिका ऑक्सीजन उत्पादन प्रकल्पासाठी जागेचा शोध घेईल आणि त्यानंतर इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या जातील.
या प्रकल्पासाठी सुमारे 5 ते 10 गुंठे जागेची गरज आहे. या ऑक्सिजन प्रकल्पात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपनीला महापालिकेकडून जागा, वीज पुरवठा, पाणीपुरवठा आणि अन्य इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. त्याबदल्यात संबंधित कंपनीने अन्य नियम व अटी पाळून सरकारला मोफत ऑक्सिजन पुरवठा केला पाहिजे असे डॉ. डुमगोळ यांनी स्पष्ट केले.ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची ही योजना दीर्घ कालावधीसाठीची असून यासाठीचा खर्च अंदाजे 20 लाखापासून ते 1 कोटी रुपयापर्यंत असणार आहे. या प्रकल्पाच्या स्वयंचलित युनिटची किंमत सुमारे 50 लाख रुपये इतकी असून नवे युनिट उभारणीसाठी किमान 10 दिवस तरी लागणार आहेत.
हे युनिट जम्बो ऑक्सीजन सिलेंडर भरण्याबरोबरच (रिफील) बेळगाव शहर परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या आणि ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेची काळजी घेईल. खाजगी हॉस्पिटलसाठी या ठिकाणी ऑक्सीजन रिफिल करून घेणे हे बाजारपेठेतील दरापेक्षा अत्यंत स्वस्त असेल असे सांगून सदर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी तज्ञांचा सल्ला घेतला जाणार असल्याचेही आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ सांगितले.