Friday, November 15, 2024

/

महापालिकेचे दुर्लक्ष : अनेक विहिरी ड्रेनेजच्या पाण्याने दुषित

 belgaum

फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईनकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे जवळपास तब्बल 6 विहिरी दूषित झाल्या असून काहींच्या घराच्या आवारात ड्रेनेजचे सांडपाणी शिरण्याचा संतापजनक प्रकार महाद्वार रोड (यश हॉस्पिटल मागे) येथे घडला आहे.

महाद्वार रोड (यश हॉस्पिटल मागे) येथील मारुती मंदिरासमोर रस्त्याशेजारी असलेली ड्रेनेजची पाईपलाईन गेल्या अनेक दिवसापासून तुंबून फुटली आहे. त्यामुळे ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने याठिकाणी दुर्गंधीयुक्त अस्वच्छ वातावरण पसरले आहे.

या दुर्गंधीयुक्त अस्वच्छ वातावरणामुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढून नागरिक विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.

गळती लागलेल्या ड्रेनेज पाईपमधून इतक्या मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर वाहत आहे की ते आसपासच्या घरांच्या आवारामध्ये घुसले आहे. घराच्या उंबरठ्यापर्यंत सांडपाणी आल्यामुळे नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. बिचाऱ्या नागरिकांना रोजच्या रोज बादली अथवा अन्य पात्राच्या सहाय्याने घराच्या आवारात शिरलेले पाणी बाहेर फेकावे लागत आहे. फुटलेल्या ड्रेनेज संदर्भात वारंवार तक्रार करून देखील महापालिकेकडून त्याची अद्यापपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही.

स्थानिक रहिवासी राजनारायण पुंडलिक जाधव यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईनकडे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. घरांच्या उंबर्‍यापर्यंत जमिनीचे सांडपाणी येत आहे यासंदर्भात आठ दिवसापूर्वी महापालिकेकडे तक्रार केली होती.Mahadwar road

मात्र अद्यापही त्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही असे सांगून या पद्धतीने ड्रेनेजचे सांडपाणी घराघरापर्यंत पसरण्याचा हा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणची ड्रेनेज पाईपलाईनच बदलून त्या ठिकाणी नवी पाईपलाईन घालावी, अशी मागणी जाधव यांनी केली.

सर्वाधिक गंभीर बाब ही आहे की, फुटलेल्या ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून या भागातील जवळपास 7 विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या विहिरीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे सांडपाणी मिसळत आहे की त्यामुळे या विहिरींना दुर्गंधीयुक्त सांडपाण्याच्या मोठ्या डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चांगल्या नितळ पाण्याच्या विहिरी खराब झाल्यामुळे येथील गृहिणीवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महापालिकेच्या नांवाने लाखोल्या वाहिल्या जात आहेत.

तेंव्हा महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित फुटलेली ड्रेनेज पाईपलाईन युद्धपातळीवर दुरुस्त करावी. त्याच प्रमाणे येथील दूषित झालेल्या विहिरीतील पाणी पुन्हा स्वच्छ होईल यादृष्टीने उपाय योजना कराव्यात, अशी जोरदार मागणी महाद्वार रोड परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.