आज संपूर्ण देशभरात पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरू होती आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणारी एक निवडणुक महाराष्ट्रात चर्चेची होती ती म्हणजे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक… केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती आणि याच निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांची उमेदवारी होती आणि या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात उभा ठाकला होता महाराष्ट्र एकीकरण समितीचा तगडा उमेदवार शुभम शेळके
समितीमध्ये आता काही शिल्लक नाही , समितीमध्ये अनेक गट आहेत अशी टीका अनेक वेळा राष्ट्रीय पक्षांकडून आणि कन्नड संघटनांकडून केली जात होती मात्र याला चोख प्रत्युत्तर दिलं ते महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांनी
या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार शुभम यांनी तब्बल सव्वा लाख मत घेतली आहेत त्यामुळे बेळगाव सह सीमा भागात अजूनही महाराष्ट्र एकीकरण समिती जिवंत आहे हे त्याचंच एक उदाहरण म्हणावे लागेल. गेल्या वीस वर्षांपासून या ठिकाणी भाजपचाच खासदार निवडून येतोय पण यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र एकीकरण समितीने भाजपसह काँग्रेसला तगड आव्हान दिलं म्हणूनच मंगला अंगडी यांचा फक्त 2900 मतांनी विजय झाला त्यामुळे सतीश जारकीहोळी यांनाही निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली त्यानंतर सुरुवातीपासूनच मंगला अंगडी या आघाडीवर होत्या पण विसाव्या फेरीनंतर पुन्हा एकदा सतीश जारकीहोळी यांनी आघाडी घेतली होती शेवटी पाच फेऱ्या शिल्लक असतानाच जारकीहोळी हे पस्तीसशे मतांनी आघाडीवर होते पण शेवटच्या तीन फेऱ्या शिल्लक असताना मंगला अंगडी यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आणि ती आघाडी कायम ठेवली म्हणूनच मंगल अंगडी या 2900 मतांनी निवडून आल्या, त्यामुळे बेळगावचा खासदार आता पुन्हा एकदा भाजपचा असणार हे जरी सिद्ध झाले असल तरी यापूर्वी विजयी उमेदवारांचे लीड हे लाखांत असायचे, पण फक्त 2900 मतांवर भाजपला आपला विजय मानावा लागला ते समितीमुळेच, महाराष्ट्र एकीकरण समितीने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आव्हान दिलं हे मात्र नाकारता येत नाही त्यामुळेच जरी आजच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झालेला असला तरी या पुढच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने एकसंघ राहणे गरजेचे आहे. सीमाभागातील 865 गाव आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत मराठी आणि भगव्याची अस्मिता जपत मराठी माणूस आजही सीमाभागात कानडी जुलमी अत्याचार सहन करतोय पण याच मराठी माणसाला आता महाराष्ट्र एकीकरण समितीने एकाच छताखाली आणले आहे, आता गरज आहे ती महाराष्ट्र एकीकरण समिती मधल्या नेत्यांनी एकसंध राहण्याची…
विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील बेळगाव मध्ये प्रचारासाठी आले होते आरोप-प्रत्यारोप ही मोठ्या प्रमाणात झाले होते, त्यामुळे या निवडणुकीकडे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याचे लक्ष लागलं होतं
संदीप राजगोळकर, कोल्हापूर