Friday, January 17, 2025

/

भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचा उपक्रम

 belgaum

सध्याच्या अतिशय संसर्गजन्य परिस्थितीत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात हेळसांड होत आहे. तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन मृताच्या नातलगांची लूट होत असल्याने भाजप बेळगाव ग्रामीण मंडळने आदर्शवत उपक्रम हाती घेताना कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वतः उचलली आहे.

गेल्या कांही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून संसर्गाच्या भीतीमुळे कोणी पुढाकार घेऊन मदतीस येत नसल्यामुळे मृतदेहाची विटंबना होण्याचे प्रकार घडत आहे आहेत. कांही जण या परिस्थितीचा गैरफायदा घेत मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे उकळून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत. या पद्धतीने अडचणीत सापडलेल्या नागरिकांची लुबाडणूक थांबविण्यासाठी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी जनहितार्थ कोरोनाग्रस्त व्यक्तीवरील अंत्यसंस्काराचा आदर्शवत उपक्रम सुरू केला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीला हात लावण्यास कोणीही तयार होत नाही. अशावेळी हे भाजप कार्यकर्ते शववाहिका घेऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून जातात. हॅन्ड ग्लोज व पीपीई किटसह सज्ज असणारे हे कार्यकर्ते मृतदेह हॉस्पिटल अथवा घरापासून स्मशानभूमीपर्यंत नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करतात.

धनंजय जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध आखणी केली आहे. यासाठी तालुक्यातील ठराविक गावांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या तुकड्या नियुक्त करण्यात आले आहेत. या तुकड्या कोणाकडूनही एक पैसाही न घेता आपापल्या भागातील कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्यरत असतात. भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्याभरात कणबर्गी, कल्लेहोळ, आंबेवाडी, बेळगाव आदी ठिकाणच्या एकूण 8 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.Funeral bjp

कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती वर अंत्यसंस्कार करण्याचा हा उपक्रम भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे कार्यकर्ते स्वखर्चातून राबवतात हे विशेष होय. आठ दिवसापूर्वी हा उपक्रम जेंव्हा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे घालून शववाहिकेसाठी मारुती व्हॅन खरेदी करण्यास मदत केली आणि एक -दोन दिवसात आम्ही व्हॅन खरेदी केली, असे धनंजय जाधव यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले. सदर उपक्रम राबविण्यासाठी भाजपचे सुमारे 40 कार्यकर्ते कार्यरत असून यामध्ये बागेवाडी भागातील 12, बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील 20 आणि पश्‍चिम भागातील सुमारे 8 -10 कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे सांगून जाधव यांनी आपल्या या उपक्रमाची माहिती दिली.

दरम्यान, आज शनिवारी सकाळी सुळेभावी येथे कोरोना संक्रमित तरुणाचा म्रुत्यु झाला. कुटुंबातील व्यक्तीनी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव याना फोन करुन माहिती दिली व अंत्यविधी करण्याची विनंती केली. तेंव्हा धनंजय जाधव, सरचिटणीस पंकज घाडी, कार्यालय सेक्रेटरी नारायण पाटील, कार्यकर्ते राजू कळशेकर, हिंडलगा सुळगा शक्ती केंद्र प्रमुख बाळू पाटील, मंडल उपाध्यक्ष गणपती होस्मनी आदींनी कोविड नियमांचे पालन करत. हिन्दु रितीरीतिरिवाजानुसार सुळेभावी स्मशानभुमीमध्ये त्या तरुणावर अंत्यसंस्कार केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.