बीम्स हॉस्पिटलमधील ढासळलेली सुरक्षा व्यवस्था पुन्हा व्यवस्थित मजबूत करण्याची जबाबदारी एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्यावर सोपविण्यात आली असून आज त्यांनी रोल कॉल घेऊन योग्य ते नियोजन केले.
बीम्स हॉस्पिटलमध्ये 65 सुरक्षारक्षकांसह 25 होमगार्ड सुरक्षा व्यवस्थेसाठी तनात आहेत. मात्र या सर्वांकडून सुरक्षा व्यवस्थेचे काम व्यवस्थितरित्या होत नव्हते. कोरोनाग्रस्त रुग्णासह त्यांच्या अटेंडर्सना हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला जात असल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या अटेंडर्सना देखील हॉस्पिटलमध्ये विशेष करून कॅज्युलिटी, मेडिकल आणि मॅटर्निटी वॉर्डमध्ये प्रवेश दिला जाऊ नये असा आदेश काढला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याबरोबरच बीम्स हॉस्पिटलमधील ढासळलेली सुरक्षा व्यवस्था पुन्हा मजबूत करण्यासाठी एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखाली ज्यादा पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे आज पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी हॉस्पिटलमधील सर्व सुरक्षा रक्षक, होमगार्ड आणि पोलिसांचा रोल कॉल घेतला. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने असली पाहिजे याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. अटेंडर्सना वाॅर्डमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. प्रामुख्याने हॉस्पिटलमधील कॅज्युलिटी आणि मेडिकल वार्डमध्ये याची काळजी घेतली जावी, असे मुशाफिरी यांनी स्पष्ट केले.
कोरोना समाप्त होईपर्यंत पोलिसांकडे कोरोना वॉरियर्स म्हणून पाहिले जाणार आहे. तेंव्हा लोकांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या. तुमच्या मदतीची त्यांना जास्त गरज आहे. तुमचे नेहमीचे काम वेगळे हे काम वेगळे आहे. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांशी सौजन्याने वागा. त्यांना परिस्थिती नीट समजावून सांगा.
हॉस्पिटलमध्ये येणारे लोक आधीच त्रासलेले असतात त्यामुळे त्यांचे वर्तन कांही वेळा अरेरावीचे असते. तेंव्हा त्यांना नीट समजून घेऊन शांत करण्याची जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा. पोलीस आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी यांच्यात समन्वय असला पाहिजे असे सांगून जावेद मुशाफिरी यांनी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शनपर सूचना केल्या.