लॉक डाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरानजीकच्या अलारवाड क्रॉसनजीक बॅरिकेड्स लावून रस्ता अडविण्यात आला आहे. परिणामी या भागात शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना ये -जा करणे अवघड झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आज सकाळपासून अलारवाड क्रॉसनजीक बेरिकेड्स लावून शहराकडे येणारा रस्ता बंद करून लोकांना अडवण्यात येत आहे. त्यामुळे विशेष करून शेतकरी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे.
हलगा आणि अलारवाड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी बेळ्ळारी नाल्यापर्यंत आहेत. तसेच जुने बेळगाव आणि शहापूर भागातील शेतकऱ्याच्या जमिनी हलगा व अलारवाड परिसरामध्ये येतात. रस्त्यावरील बॅरिकेड्समुळे या शेतकऱ्यांना वाहने घेऊन आपल्या शेताकडे जाणे अवघड होऊन बसले आहे.
अलारवाड क्रॉस येथे रस्त्यावर बॅरिकेड्स लावून पोलीस शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर व दुचाकींची अडवणूक करत आहेत. सध्या शेतामध्ये मशागतीचे दिवस असताना या पद्धतीने अडवणूक केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच सदर बॅरिकेड्स हटवून शेतकर्यांना त्यांच्या कामासाठी शेताकडे जाऊ दिले जावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.