बेळगावमधील राजकारणाच्या वर्तुळात अनेक दिग्गज राजकारण्यांमध्ये एका राजकारणी कुटुंबाचे वर्चस्व आहे. ते म्हणजेच जारकीहोळी कुटुंब. कर्नाटकात तीन ठिकाणी पोटनिवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
बेळगावच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक असलेल्या जारकीहोळी बंधूंची भूमिका या निवडणुकीत लक्षवेधी ठरत आहे. काँग्रेसमधील नेते लखन जारकीहोळी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असून आज भाजपचे मंत्री जगदीश शेट्टर, मंत्री उमेश कत्ती, मंत्री भैरती बसवराज यांनी गोकाक येथील लखन जारकीहोळी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर लखन जारकीहोळी यांच्या भाजप प्रवेशाची दाट शक्यता दिसून येत आहे.
गोकाक येथील लखन जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांनी दिलेल्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते लखन जारकीहोळी म्हणाले, आपले बंधू भालचंद्र जारकीहोळी आणि रमेश जारकीहोळी यांच्याशी माझ्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा करून निर्णय घेईन. अनेक मोठ्या नेत्यांनी भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले असून माझ्या बंधूंशी आणि समर्थकांशी बोलून, अभिप्राय घेऊन अधिकृतपणे घोषणा करेन, असे लखन जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
17 एप्रिलला होणार्या बेळगाव लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत मी भाजपाला पाठिंबा देईन. आमदार सतीश जारकीहोळी यांना काँग्रेसने तिकीट का दिले हे मला समजले नाही.
आपल्याल्या त्यांच्या प्रचाराच्या बाजूने जायला लाज वाटते असे म्हणणारे लखन जारकीहोळी काँग्रेसच्या विरोधात उभे होते. प्रदेश काँग्रेसकडेही चार सदस्यीय हाय कमांड (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण) आहे. चांगल्या लोकांची किंमत काँग्रेसमध्ये नसते. म्हणून मी पक्षाशी संपर्क कमी केला आहे, असे ते म्हणाले.