निवडणूक आणि राजकारणात केवळ पैशांच्या जोरावर सत्ता स्थापन करून गाजविण्यात येते. निवडणुकीच्या काळात पैशांच्या जोरावर मतदारांना विविध आमिष दाखवून खरेदी करण्याचाच जणू सौदा करण्यात येतो. आज तालुक्याच्या पूर्व भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांनी प्रचाराला सुरूवात केली.
आज प्रचाराचा पहिलाच दिवस असून देखील तालुक्यातील पूर्व भागातील गावांनी शुभम शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला. याचप्रमाणे हि निवडणूक लढण्यासाठी आशीर्वादरूपी देणगीदाखल आर्थिक मदत देखील केली. मराठी स्वाभिमान जपणाऱ्या नागरिकांनी राष्ट्रीय पक्षांच्या सौदेबाजीला जोरदार चपराक देत चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.
रविवारी (दि. ४) शुभम शेळके यांनी निलजी आणि मुतगा या गावांमध्ये प्रचाराची सुरुवात केली. निलजी गावातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात झाली. त्यानंतर मुतगा गावातदेखील शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून प्रचार करण्यात आला. दरम्यान दोन्ही गावातील जनतेने शुभम शेळके यांना उस्त्फुर्तपणे पाठिंबा दिला. तसेच लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून विजयी करण्याचा निर्धार केला. मुतगा गावातील प्रचारादरम्यान खुद्द मतदारांनीच शुभम शेळके यांना आशीर्वादरूपी आर्थिक मदत केली. देणगी ही 100 रु 500 रु.हजार अशी मदत मिळत आहे निलजी मुतगा गावातून 12800 रुपये लोक वर्गणी मिळाली आहे.
राष्ट्रीय पक्ष मतदारांना खरेदी करते, याचे प्रत्यंतर अनेक निवडणुकीत आले आहे. परंतु तालुक्यातील मराठी जनतेने उमेदवारालाच देणगी देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. ही निवडणूक राष्ट्रीय पक्ष पैशांच्या जोरावर जरी लढत असली तरी महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आणि वर्चस्व पुन्हा एकदा ताठ मानेने सिद्ध करण्यासाठी स्वाभिमानी मराठी जनतेच्या जीवावरच लढवून जिंकेल, असा ठाम विश्वास शुभम शेळके यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय पक्षात वरिष्ठांचा वरदहस्त घेऊन पैशांच्या जोरावर निवडणूक लढविण्यापेक्षा मतदारांचा विश्वास संपादन करून निवडणूक लढविण्यास भाग्य लागते, असेही वक्तव्य शुभम शेळके यांनी व्यक्त केले.
सीमाभागातील सध्याची परिस्थिती आणि मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि अत्याचार या साऱ्याला मराठी जनता वैतागली आहे. बेळगाववार मराठीची सत्ता यावी, यासाठी उमेदवारांसह मराठी जनता कंबर कसून तयार आहे. शुभम शेळके यांच्या पहिल्याच दिवशी सुरु झालेल्या प्रचारावेळी त्यांना मिळालेला पाठिंबा पाहून या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शुभम शेळके यांचा विजय निश्चित आहे, असे चित्र दिसत आहे.