कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात येणार असून सध्या राज्यात कर्फ्यू जारी करण्यात आला असला तरी या कर्फ्यूच्या काळातही लसीकरणाची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे बुधवारी ही माहिती दिली असून शहरी भागातील 45 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी गटागटाने लसीकरण केले जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार असून त्यांना ओळखपत्र किंवा पास देण्यात येणार आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या किंवा अधिकृत स्वयंसेवकांकडे लसीकरणासाठी आवश्यक चिठ्ठी किंवा पास देण्यात येणार आहेत. पंचायत राज व ग्रामीण विकास खात्याकडून कोरोना लसीकरणासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या वाहनांना देखील आवश्यक पास व स्टिकर देण्यात येणार आहेत. आरोग्य केंद्रांची क्षमता लक्षात घेऊन एका गटात 5 ते 10 जणांना लस देण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी जाताना नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत घेणे बंधनकारक आहे. लसीकरण केंद्रावर झुंबड किंवा गर्दी होऊ नये, त्याठिकाणी शिस्त पाळली जावी यासाठी पोलिसांसह यांनी एनएसएस व एनसीसी छात्रांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येकाने कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी डाॅ. के. हरीशकुमार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे