परसातील मोकळ्या जागेत क्रिकेट खेळणाऱ्या दोन भावंडांचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना कलमेश्वरनगर मजगाव येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या दोन्ही मुलांना वाचविण्यास गेलेला युवक देखील विहिरीत बेशुद्ध पडला. मात्र त्याला त्वरेने बाहेर काढण्यात आल्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले.
विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नांवे आनंद अडव्याप्पा हणबर (वय 13) आणि आकाश अडव्याप्पा हणबर (वय 15) अशी आहेत. मजगावच्या कलमेश्वरनगर, थर्ड क्रॉस येथील आनंद हणबर आणि आकाश हणबर ही दोन शाळकरी भावंडे शाळेला सुट्टी असल्यामुळे काल शुक्रवारी दुपारी आपल्या घराच्या परसातील मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत असताना चेंडू विहिरीवरील झाकलेल्या जाळीवर जाऊन पडला. तो काढण्याच्या प्रयत्नात लहान भाऊ आनंद विहरीवरील जाळीचे झाकण तुटल्याने विहिरीत पडला. तेंव्हा त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ आकाश तात्काळ दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरला.
मात्र विहिरीत प्राणवायू कमी असल्याने दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला. या दोन्ही भावंडांना पोहता येत होते. मात्र खोल विहिरीत घूसमटल्यामुळे त्यांचे प्राण गेले.
सदर घटना घडली त्यावेळी मुलांची आई माला ही घरीच होती. विहिरीत काहीतरी पडल्याच्या आवाजाने बाहेर येऊन पाहते तर दोन्ही मुले दिसेनाशी झाल्याने तिने आरडाओरड करताच लोक जमा झाले. विहिरीत वाकुन पाहिले असता दोन्ही मुले विहिरीत पडलेली दिसत होती. हे दृश्य पाहणाऱ्या पैकी शेजारचा तरूण सचिन शहापूरकर याने स्वतःला दोर बांधून घेऊन विहिरीत उतरून दोन्ही मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही गुदमरुन पडल्याने त्याला तात्काळ बाहेर ओढून काढले असता तो बेशुद्ध पडला होता. मात्र वेळीच विहिरीबाहेर काढल्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेऊन उपचार सुरु करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, एसडीआरएफ दल आणि उद्यमबाग पोलिसांनी त्वरेने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले. यावेळी वरून पाण्याचा मारा करून अग्निशामक व एसडीआरएफच्या जवानांनी विहिरीतील हवा खेळती केली आणि मोठ्या कौशल्याने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर उद्यमबाग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले.
दुर्दैवी मृत्यू मुलांचे वडील अडव्याप्पा नागप्पा हणबर हे मूळचे विरप्पनकोप्प (ता. जि. बेळगाव) येथील रहिवासी असून गेली 22 वर्षे ते मजगाव येथील कळमेश्वरनगर येथे स्वतःचे घर बांधून राहतात.
ते फरशी फिटिंगचा व्यवसाय करतात. त्यांना आनंद व आकाश ही दोनच मुले होती. सदर मुलांची आई मालाही घर काम करत असते. मुलांच्या मृत्यूमुळे हणबर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान सदर घटनेबद्दल कलमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.