साखर कारखान्याच्या सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित होण्याबरोबरच शेत जमीन खराब होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे प्रवेशद्वारच ट्रॅक्टरने अडवून बंद केल्याची घटना आज सकाळी येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, काकती येथील साखर कारखान्याचे सांडपाणी उघड्यावर सोडले जाते. सांडपाण्याच्या निचऱ्याचे नियोजन न करता उघड्यावर सोडण्यात येणारे हे पाणी जमिनीमध्ये झिरपून परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी दूषित झाल्या आहेत. सदर विहिरीमधील पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून ते आरोग्यास धोकादायक बनले आहे. हेच पाणी पिकांसाठी सोडण्यात येत असल्यामुळे शेतामध्ये दुर्गंधी फैलावण्याबरोबरच शेतजमीन खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काकती येथील शेतकरी संभाजी निळकंठाचे, अण्णाप्पा पाटील, परशुराम सोनुलकर आदी शेतकऱ्यांच्या विहिरींमधील पाणी दूषित झाले आहे. मार्कंडेय साखर कारखान्याकडून गेल्या अनेक महिन्यांपासून या पद्धतीने सांडपाणी उघड्यावर सोडण्याचा प्रकार सुरू आहे.
यासंदर्भात काकती परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाकडे तक्रार करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. काकती येथील शेतकरी संभाजी निळकंठाचे यांनी दोन महिन्यापूर्वी कारखान्याकडे पुन्हा एकदा मागणी करून सांडपाणी उघड्यावर न सोडता त्याचा योग्य प्रकारे निचरा करावा आणि आमच्या विहिरी व शेताचे नुकसान थांबवावे अशी विनंती केली होती.
परंतु त्याची देखिल आजतागायत दखल घेण्यात न आल्यामुळे आज सकाळी संभाजी नीळकंठाचे, होनप्पा पाटील, परशुराम सोनुलकर आदी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन मार्कंडेय साखर कारखान्याचे प्रवेशद्वार ट्रॅक्टर ट्रॉली आडवी लावून बंद केले. तसेच जोपर्यंत कारखान्याचे सांडपाणी उघड्यावर सोडण्याचे बंद केले जाईल, असे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात मार्कंडेय साखर कारखान्याच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता कारखान्यातील सांडपाण्यासाठी स्वतंत्र तलाव सदृश्य खड्ड्याची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
यापूर्वी देखील कारखान्यातील सांडपाण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेऊन कारखाना प्रशासनाने सांडपाण्यासाठी स्वतंत्र खड्ड्याची निर्मिती केली आहे. तेंव्हा यापुढे कारखान्यातील सांडपाण्यामुळे आसपासच्या शेत मालकांच्या शेतातील विहिरी आणि शेताला धोका निर्माण होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल, असेही कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे.