कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पुन्हा लॉक डाऊन होऊन मागील वर्षाच्या विपत्तिची पुनरावृत्ती होईल या भीतीपोटी आपल्या गावी परत जाण्यासाठी मध्यप्रदेशच्या दोन कामगारांनी बेंगलोरहून रेल्वे मार्गाने चक्क तब्बल सुमारे 611 कि. मी. पायी चालत बेळगाव गाठले असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
पवन धुरवे (रा. अझवर रैयत, जि. डिंडोर, मध्य प्रदेश) आणि फुंदे मिठूसिंग लाल (रा. कुंदवारी, जि. डिंडोरी, मध्य प्रदेश) अशी या दोन कामगारांची आहेत. हे दोघेजण बेंगलोर येथे कंत्राटी पद्धतीने कामाला होते. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने पुन्हा लॉक डाऊन जारी होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉक डाऊनची पुन्हा अचानक घोषणा झाल्यास मागील वर्षाप्रमाणे गावी स्थलांतरित होण्यासाठी सोसाव्या लागलेल्या हाल-अपेष्टांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बंगलोर, दिल्ली, मुंबई, कोलकाता आदी मोठ्या शहरांमध्ये कामाला असणारे परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परतू लागले आहेत.
याच पद्धतीने मागील वर्षी लॉक डाऊनच्या वेळी झालेली आपली दुर्दशा टाळण्यासाठी बेंगलोर येथील पवन धुरवे व फुंदे लाल या दोघांनी आपल्या मूळगावी परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैव असे की त्यांच्या कंत्राटदाराचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना त्यांचा पगारही देखील मिळाला नाही. परिणामी बस, रेल्वे आदी प्रवास भाड्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे या दोघांनी थेट रेल्वेच्या पटरीवरून चालत आपले गाव गाठण्याचा निर्धार केला आणि गेल्या 12 दिवसापूर्वी आपल्या पायी प्रवासाला प्रारंभ केला.
आज सकाळी बेळगावातील न्यू गांधीनगर येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी असलेल्या गेटमनच्या केबिनमध्ये जाऊन या दोघा कामगारांनी पुणे येथून किती किलोमीटर अंतरावर आहे? अशी चौकशी केली. थकल्या भागलेल्या त्या दोघांना पाहून तेथे रेल्वे गेटमन म्हणून सेवा बजावत असणाऱ्या उमेश आपटेकर यांनी कुतूहलापोटी त्यांची चौकशी केली असता ते उभयता चक्क बेंगलोरहून पायी चालत बिहारच्या दिशेने निघालेल्याचा खरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हळहळ वाटणारी बाब ही की खिशात दमडीही नसल्यामुळे कंगाल अवस्थेतील बिचाऱ्या या कामगारांनी वाटेत मिळेल ते खाऊन फक्त पाण्यावर तहान भागवत बेळगावपर्यंतची तब्बल सुमारे 611 कि. मी. अंतराची पायपीट केली आहे.
तेंव्हा त्या दोघा कामगारांची दया येऊन रेल्वे गेटमन उमेश आपटेकर यांनी लागलीच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे त्या परप्रांतीय कामगारांना मदत करण्याची विनंती केली. तेंव्हा शेळके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या दोन्ही कामगारांची विचारपूस केली. तसेच त्या उभयतांना त्यांच्या गावी सुखरूप पोचविण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले. याप्रसंगी रवी निर्मळकर, सचिन केळवेकर, राजू मुतकेकर, उमेश आपटेकर आदी उपस्थित होते. शुभम शेळके यांनी आपल्या आश्वासनानुसार पवन धुरवे व फुंदे लाल या दोघांची तूर्तास गांधीनगर येथे राहण्याची तसे जेवण खाण्याची व्यवस्था केली असून त्या दोघांच्या इच्छेनुसार उद्या सायंकाळी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वे गाडीने त्यांची इटारसीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.