कोविड संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी बेळगाव जिल्हा तालुका स्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक अधिकाऱ्यांनी कोविड -१९ मार्गसूचीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. के हरीश कुमार यांनी दिली आहे.
कोविड मार्गसूचीच्या अंलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार यांनी मंगळवारी बैलहोंगल, कित्तूर आणि खानापूर तालुक्यांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी आयोजिण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
कोविड नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. तालुका पातळीवर अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके स्थापन करून कोविड–१९ मार्गसूचीचे काटेकोर पालन करण्यात येत आहे का? यावर कडक लक्ष ठेवावे, कोविड मार्गसूचीच्या कडक अंमलबजावणीसाठी तहसीलदार, तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्याधिकारी, स्थानिक संस्थांचे मुख अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांचा समावेश असलेल्या पथकांची रचना करून समन्वयाने काम करावे.
कोविडग्रस्तांची माहिती घेणे, रुग्णांना तातडीने उपचार पुरविणे आणि या सर्व कामासाठी तालुका केंद्रामध्ये वॉर रूम सुरु करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यात दररोज किमान पाचशे जणांची कोविड चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून एका आठवड्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देऊन कोविडच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला तहसीलदार, तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्याधिकारी, स्थानिक संस्थांचे प्रमुख अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.