दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला पराभूत करणे हेच आपले उद्दिष्ट्य असल्याचे विधान माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांनी केलं आहे. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. केंद्रात असलेले भाजपचे सरकार हे शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला यांच्या विरोधातील जनविरोधी सरकार आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून जनता सर्वनाशाकडे मार्गक्रमण करत असल्याचा आरोप बाबागौडा पाटील यांनी केला.
या जनविरोधी सरकारला आगामी निवडणुकीत पराभूत करणे आणि शेतकऱ्यांची शक्ती दाखवून देणे हे आपले उद्दिष्ट्य असल्याचे बाबागौडा पाटील म्हणाले.
सततची महागाई, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, इंधन वाढ, शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे अंमलात आणणे या सर्वांमुळे हे सरकार देश चालविण्यात सपशेल हरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या सरकारला पाडणे हेच योग्य असल्याचे या पत्रकार परिषदेत बोलण्यात आले. या पत्रकार परिषदेला कामगार नेते नागेश सातेरी, शेतकरी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.