राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता वाढली असताना खाजगी हॉस्पिटल्समध्ये आवश्यक उपकरणांसह कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. बेळगाव शहरातील हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची सुमारे 50 टक्के कमतरता निर्माण झाल्याचे खाजगी हॉस्पिटल्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
देशात मागील वर्षी कोरोनामुळे पहिल्या वेळी निर्माण झालेल्या संकट काळात वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली होती. ते कर्मचारी पुन्हा परत आलेच नाहीत. त्यापैकी अनेकांनी परदेशात नोकर्या मिळवल्या आहेत. त्यामुळे सध्या प्रशिक्षित कर्मचारी मिळणे कठीण झाले असून खाजगी हॉस्पिटल्समध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.
खाजगी हॉस्पिटल्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. एच. एम. प्रसन्ना यांनी याला दुजोरा दिला आहे. बेंगलोर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने अनेक हॉस्पिटल्समध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा देताना अडचणींना सामना करावा लागत असल्याचे डॉ. प्रसन्ना यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील अशीच अवस्था आहे. एमसीआयनुसार जनरल वॉर्डमध्ये 10 बेडला एक नर्स, एचडीयू 3 बेडला एक नर्स, आयसीयू 2 बेडला एक नर्स आणि व्हेंटिलेटर असलेल्या आयसीयूमध्ये प्रत्येक भेटला एक नर्स असणे आवश्यक आहे. मात्र सरकारी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे चित्र सध्या पहावयास मिळत नाही.