मागील 60 ते 65 वर्षापासून सीमाभाग अन्यायाच्या जोखडात अडकला आहे. कर्नाटकी अत्याचार आणि येथील जनतेवर करण्यात येणारे अन्याय यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे. याच त्रासातून बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना मतदान करून दिल्लीत पाठवा आणि येथील होणारे अन्याय आणि अत्याचाराचा पाडा लोकसभेत प्रत्येकाच्या कानी पडावा यासाठी प्रयत्न करा. सीमाभागात एकजुटीने शुभम शेळके यांना मत देऊन विजयी करा असे आवाहन शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केले.
बेळगाव येथे शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ त्यांनी वरील आवाहन केले आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा येथील जनतेशी माझा काहीएक संबंध नाही. आपली लढाई केंद्र सरकारशी आहे. त्यांनीच तातडीने हा प्रश्न सोडवावा पंडित नेहरू यांनी केलेली चूक मोदी यांनी सुधारून येथील जनतेला न्याय द्यावा असे आवाहन त्यांनी केले. देशात अनेक ठिकाणी मोदी भांडणे सोडवत आहेत. मात्र मागील पाच वर्षांपासून बेळगाव सीमाभागावर होत असलेल्या अन्याय त्यांना दिसत नाही. असा सवाल करत लोकसभेत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उभ्या असलेल्या शुभम शेळके यांना निवडून देण्यासाठी एकीची वज्रमूठ गरजेचे आहे. त्यामुळे आता सर्वांनी आळस झटकून शुभम शेळके यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारी सुरू करा असेही ते म्हणाले.
ज्यावेळी शुभम शेळके यांनी अर्ज भरला त्या वेळीच येथील राष्ट्रीय पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. समितीच्या सिंहाची गर्जना ऐकून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाकडून आमिषे व खैरात वाटण्यात येत आहे. मात्र या खैरातीला बळी न पडता सिंहाला विजयी करण्याचा निर्धार सर्वांनी करावा. ज्यावेळी सीमाभागावर अन्याय झाला आहे त्या त्या वेळी महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी व बहुजन समाज आणि सारेच पक्ष सीमा भागाच्या पाठीशी उभे राहतात. संयुक्त महाराष्ट्रासाठी शिवसेनेने 70 हून अधिक हुतात्मे दिले आहेत आणि आजही ते मागे राहणार नाहीत. जर महाराष्ट्राच्या मनात आले तर कर्नाटकाची नांगी आवळू शकतात. महाराष्ट्रातून देण्यात येणारे पाणी आणि इतर सर्व काही व्यवहार बंद केल्यास कर्नाटक अडचणीत येईल. मात्र आम्ही छत्रपती शिवरायांचे शिवसैनिक असल्यामुळे माणुसकीने आजपर्यंत गप्प राहिलो आहोत. त्यामुळे कर्नाटकाने येथील मराठी भाषिकांवर अन्याय सोडावे अन्यथा येत्या काळात मोठी अडचण निर्माण करु असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
हातकणंगले येथील खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भाषणातून नवस्फूर्ती निर्माण केली. बेळगाव सीमाभागात पुन्हा एकदा म. ए. समितीचा ध्वज उंचावेल. हा ध्वज उंचावून ठेवण्यासाठी सीमा भागातील मराठी जनतेने शुभम शेळके यांच्या पाठीशी राणे गरजेचा आहे. मागील 65 वर्षापासूनची लढाई मराठी माणसाची अस्मिता आणि अस्तित्वाची आहे. त्यामुळे या लढाईत सर्वांनी शिभम शेळके यांच्या पाठीशी राहून त्यांना बहुमोल मतांनी निवडून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. शुभम शेळके हे सर्वात कमी वयाचे खासदार म्हणून दिल्लीत जाणार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद नागणुरी, जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, संग्राम कुपेकर, मदन बामणे, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शिवसेना संघटक दत्ता जाधव, यासह इतर समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते