सावगाव (ता. बेळगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा आज सोमवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
सावगाव येथील लक्ष्मी चौक येथे पंचधातूच्या 32 मण सिंहासनावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सुमारे साडेसहा फूट आणि छत्र धरून 11 फूट उंचीची मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा आज सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला होता. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या हस्ते अभिषेक वगैरे घालून विधीवत शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी भिडे गुरुजी यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. सावगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे.
आता यापुढे रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या पूर्णत्वावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी सर्वांनी पूर्ण क्षमतेने कामाला सांगावयास हवे. रायगडावरील सुवर्ण सिंहासन पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक गावातील 50 कार्यकर्त्यांची तुकडी सतत कार्यरत राहिली पाहिजे, असे भिडेगुरुजी यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, तालुकाप्रमुख परशराम कोकितकर, बेळगाव शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, बेळगाव तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, गावातील पंच के. वाय. घाटेगस्ती, महेश पाटील, अशोक पाटील आदींसह गावातील नागरिक आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.