महाराष्ट्रातील नेत्यांनी अथवा कोणत्याही पक्षाने येथे येऊन मराठी भाषिक उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्याची बेइमानी करू नये. मराठी माणसांची इथे जी एकजूट होताना दिसत आहे, त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका, असे आवाहन महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना समिती युतीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बेळगावला आलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपरोक्त आवाहन केले. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर या ठिकाणी मराठी भाषिकांची एकजूट पाहता आली. मराठी तरुणांचा उत्साह पाहता आला. महाराष्ट्र एकीकरण समिती असो शिवसेना असो किंवा श्रीराम सेना असो सगळे जुने लोक आता पुढे सरसावलेल्या युवापिढीला आशीर्वाद देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकेकाळी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे 6 आमदार निवडून येत होते. बेंगलोर विधान सभेमध्ये त्यांची एकत्रित ताकद दिसून येत होती. जोपर्यंत आपण येथील निवडणुका जिंकत नाही तोपर्यंत आपला आवाज कर्नाटकच्या विधानसभेत किंवा दिल्लीमध्ये पोहोचणार नाही. या अनुषंगाने सीमाभागात आता नव्याने सुरुवात झाली आहे. तरुण मुलांनी सीमाप्रश्नाची ही संपूर्ण चळवळ हातात घेतली आहे. त्यामुळे भविष्यात शासनाला याची नक्की दखल घ्यावी लागेल असे खासदार राऊत यांनी पुढे सांगितले.
भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काल स्थानिक मुख्यमंत्री आले होते. आज भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बेळगावला येत आहेत. भाजप आपली पूर्ण ताकद लावत आहे. काँग्रेस अथवा भाजपने ताकद लावली यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांनी अथवा कोणत्याही पक्षाने येथे येऊन मराठीभाषिक उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्याची बेइमानी करू नये. कारण सीमाप्रश्न आणि सीमा बांधवांशी महाराष्ट्रातील जनता आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे लोक चार पिढ्या झाल्या तरी एका नात्याने, भावनेने बांधले गेले आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा या चळवळीशी तसा संबंध नाही. भावनिक गुंतवणूक नाही. तथापि मराठी म्हणून तरी तुम्ही महाराष्ट्रासाठी येथील मराठी बांधवांसाठी हे पाप करू नका असे माझे त्यांना आवाहन आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
गडकरी हे मोठे नेते आहेत. ते फक्त विदर्भाचे नेते नाहीतर महाराष्ट्राचे सुद्धा नेते आहेत. महाराष्ट्रात सीमा प्रश्नासंबंधी ठराव गडकरी मंत्री असताना देखील झालेले आहेत. हे त्यांनी विसरू नये आजही आपण प्रत्येक विधानसभा अधिवेशनामध्ये सीमा बांधवांसंदर्भात एक ठराव करत असतो हे समजून घ्या माझे पुन्हा एकदा सर्वांना आवाहन आहे मराठी माणसांची इथे जी एकजूट होताना मला दिसते आहे त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका असे खा. राऊत म्हणाले.
येथील लढा हा मातृभाषेसाठी आहे आणि मातृभाषेचा लढा संपूर्ण विश्वात झाला आहे. ही कांही नवीन गोष्ट नाही हे केरळमध्येही ही आहे आणि महाराष्ट्रात ही आहे. आमच्या महाराष्ट्रात तर तेलगू, कन्नड, उर्दू असे लोक बहुसंख्येने राहतात परंतु आम्ही कधीही त्यांच्या शाळा बंद केल्या नाहीत. येथील मराठी भाषिकांची वाचनालये आहेत. सांस्कृतिक केंद्रे आहेत. त्यांना आमचे सरकार कायम मदत निधी अथवा सबसिडी देत आले आहे. असे करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. देश एक आहे. आमचं भांडण केंद्र सरकारशी आहे. सीमा विवाद संपूर्ण देशात पुन्हा उफाळून आले आहेत. यामध्ये सर्वात जुना सीमावाद कोणता असेल तर तो महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील आहे असे सांगून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जेंव्हा लागायचा तेंव्हा लागेल परंतु तोपर्यंत तरी येथील दहशत व अन्यायाला आळा घाला अशी विनंती आपण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असल्याची माहिती देखील खासदार संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्र सरकार तेथील कन्नड भाषिकांना जशी चांगली वागणूक देते, तशी चांगली वागणूक वागणूक कर्नाटक सरकारने येथील मराठी जनतेला दिली पाहिजे असे सांगून या निवडणुकीत मराठी भाषिकांवर अन्याय हाच मुद्दा असेल. काँग्रेस प्रमाणे राष्ट्रीय मुद्दे उचलून आम्ही लोकांचे लक्ष विचलित होऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. कालची मिरवणूक व सभेचे चित्र पाहता भाजप व महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात थेट लढत होईल असे मला वाटते. खूप वर्षानंतर अशी थेट लढत होत असून महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेला मानणारा मतदार ताकदीने उतरला, मजबुतीने उतरला तर शुभम शेळके हे नक्की शिवसेना समितीचे लोकसभेतील 19 वे आमदार आणि संसदेतील 22 वे खासदार असतील. शुभम शेळके यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर शुभम शेळके नांवाने ही लढाई सुरू झाली आहे आणि ही लढाई विजयाकडे जाईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
कर्नाटक सरकारला समजलं पाहिजे की मी येथे बसून देशाचा विचार करतो. तुम्ही देखील देशाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करा. येथील लोकांच्या अनेक समस्या आहेत. तुम्ही येथील राज्यकर्ते आहात, येथील प्रमुख आहात, नेते आहात तुम्ही कोणत्याही पक्षाचे का असेनात स्थानिक लोकांसोबत बसा चर्चा करा. अहंकाराने राजकारण चालत नाही असे सांगून येथील निवडणुकांमध्ये शिवसेना आपला उमेदवार उभा करणार नाही महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजेच शिवसेना आहे असेही खासदार संजय राऊत यांनी शेवटी सांगितले.