कोरोना रुग्णांवरील उपचारात महत्त्वाचा घटक ठरलेल्या रेमडसिवीर इंजेक्शनची सध्या देशभरात चर्चा सुरू असून या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे उपचारात अडचणी येत आहेत.
तथापि किमान बेळगावमध्ये तरी यापुढे या इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही अशी अपेक्षा आहे. कारण आता रेमडसिवीरचा उत्पादन प्रकल्प बेळगाव जिल्ह्यात सुरू होणार आहे. राज्याचे खाण व भूगर्भ विज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांनी याबाबतचे सूतोवाच केले आहे.
शुक्रवारी पत्रकारांना माहिती देताना मंत्री निराणी म्हणाले, रेमडसिवीरचा उत्पादन प्रकल्प बेळगाव सुरू करण्यास केंद्र सरकारने मुधोळच्या सतीश घारगी यांना अनुमती दिली आहे. येत्या कांही दिवसातच हा प्रकल्प सुरू होणार असून उत्पादनानंतर येथूनच रेमडसिवीरचा सर्वत्र पुरवठा करण्यात येईल.
आगामी 20 ते 30 दिवसातच रेमडसिवीरचे उत्पादन बेळगावात घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्नाटकात रेमडसिवीरची टंचाई दूर होण्यास मदत होईल. एकंदर रेमडसिवीर इंजेक्शन निर्मितीचा प्रकल्प सुरू झाल्यास बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार हे निश्चित.