कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरून काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या दोघा जणांना बेळगाव सीसीबी पोलिसांनी आज सापळा रचून रंगेहाथ पकडले. तसेच त्यांच्याकडील रेमडेसिवीर औषधाच्या बाटल्या जप्त केल्या.
मंजुनाथ दुंडाप्पा दानवाडकर (वय 35, मूळनिवासी रामपूर बनहट्टी -रबकवी जि. बागलकोट, सध्या रा. शाहुनगर बेळगाव) आणि संजीव चंद्रशेखर माळगी (वय 33, मूळनिवासी नवनगर बैलहोंगल, सध्या रा. शिवाजीनगर बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधितांना जीवदान देणारे ठरत आहे. मात्र सध्या एकीकडे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना बेळगाव सीसीबी पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करून त्यांची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या उपरोक्त दोघा जणांना अटक केली आहे.
यासाठी सापळा रचताना नागरी वेशातील पोलिसांनी सर्वसामान्य नागरिक असल्याचे भासवत आरोपींकडे जाऊन रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. आपल्या नातेवाईकांची प्रकृती गंभीर असल्याने कोणत्याही किंमतीत आपल्याला ते हवे असल्याचे सांगताच रेमडेसिवीर देऊन पैसे घेत असताना पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडील 11,600 रुपये किंमतीच्या रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या जप्त केल्या.
मंजुनाथ आणि संजीव हे उभयता बेळगाव शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत होते. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून त्याची काळ्याबाजारात आपण विक्री करत असल्याचे त्यांनी कबूल केले. हे उभयता 3,400 रुपये किमतीचे इंजेक्शन काळ्याबाजारात 25 ते 30 हजार रुपयाला विकत होते. पैशाच्या हव्यासापोटी आपण हे कृत्य करत होतो, असे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. काळ्याबाजारात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघा जणांच्या या टोळीचा छडा लावून त्यांना गजाआड केल्याबद्दल पोलीस आयुक्त डाॅ. त्यागराजन यांनी सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.