बेळगाव शहराची प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिकेला दिला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे एकीकडे राज्यातील सर्व निवडणुका लांबणीवर टाकण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असतानाच निवडणूक आयोगाने मात्र मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाचा आदेश काल सोमवारी महापालिकेला मिळाला आहे. बेळगावातील प्रत्येक प्रभागाची अंतिम मतदार यादी 21 मे रोजी प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रकच आखून दिले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा आधार घेऊन प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्याची सूचना आयोगाने दिली आहे. शिवाय 2018 साली जे नवे प्रभाग तयार झाले आहेत त्या प्रभागानुसारच ही यादी तयार केली जाणार आहे. 18 जानेवारी 2021 रोजी मतदार यादी जाहीर केली होती. त्या मतदार यादीनुसार प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय एखाद्या मतदान केंद्रावर 1 हजारपेक्षा जास्त मतदार असतील तर तेथे अतिरिक्त मतदान केंद्र तयार करण्याची सूचना देखील दिली आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बेळगाव शहरातील 1 हजार पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदार केंद्रांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम महापालिकेला नव्याने करावे लागणार नाही. आता केवळ प्रभाग निहाय मतदार यादी तयार करावी लागणार आहे. मतदार यादी तयार करताना त्यात प्रत्येक मतदाराचे छायाचित्र असावे एका मतदाराचे नांव दोन प्रभागांमध्ये येऊ नये. मतदार याद्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे आहे. ती तातडीने निवडणूक विभागाने मागून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 28 एप्रिल ते 2 मे या काळात प्रभाग निहाय मतदार निश्चित करावेत. 3 ते 5 मे या काळात मतदार यादी छपाईसाठी दिली जावी. यादी छापून तयार झाल्यानंतर 6 ते 9 मे या काळात त्याची पडताळणी करून चुकांची दुरुस्ती करावी व सुधारणा करून पुन्हा ती छापून घ्यावी.
10 मे रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करावी असे आयोगाने सांगितले आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजे 13 मेपर्यंत त्यावर आक्षेप नोंदवून घेण्यास सांगण्यात आले आहे. दाखल झालेले आक्षेप 15 ते 17 मे या काळात निकालात काढावेत. त्यानंतर 18 ते 19 मे या काळात पुन्हा एकदा मतदार यादीची पडताळणी करून त्यातील त्रुटी दूर करून 21 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.