माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना गोकाक तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु होम क्वारंटाईन होण्यासाठी सुचविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता घरातच उपचार होणार आहेत.
4 एप्रिल रोजी रात्री 10.30 च्या सुमारास, श्वसनाच्या गंभीर समस्येमुळे रूग्णालयात दाखल झालेल्या रमेश जारकीहोळी यांना शुगरही असल्याने आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले होते. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे, यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 एप्रिल रोजी रमेश जारकीहोळींना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. अचानक श्वासोच्छवासाची समस्या उद्भवल्याने गोकाक तालुका रुग्णालयात दाखल करून आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत होते. बीपी आणि शुगर कंट्रोलमुळे रमेश जारकीहोळी यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉ. रवींद्र, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान गोकाक रुग्णालयात मंगळवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) भेट देऊन रमेश जारकीहोळी यांची विचारपूस केली होती. बंगळुरातून आलेल्या दोघा अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र यांच्याशी संपर्क साधला. उपचाराबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. जारकीहोळी यांच्यावर उपचार केल्याबाबतचा अहवाल त्यांनी तयार केला. रमेश जारकीहोळी आणखी दोन आठवडे एसआयटीसमोर हजर होऊ शकणार नाहीत. त्यांना दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला तरी दोन आठवडे क्वॉरंटाईन केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कुठेही जाता येणार नसल्याचे डॉ. रवींद्र यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान कोरोना असल्याचा रमेश जारकीहोळींचा दावा खोटा असल्याचा आरोप सीडी प्रकरणातील युवतीच्या वकिलांनी केला होता. अॅडव्होकेट के. जगदीश कुमार आणि वकील सूर्य मुकुंदराज यांनी बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांच्याकडे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सीडी प्रकरणातील एसआयटी चौकशीतून पळवाट शोधल्याचा आरोप त्यांनी केला. रमेश जारकीहोळी यांना 5 एप्रिलला एसआयटी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस होती. परंतु त्यांना कोरोना लागण झाल्याने सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत.