बेळगाव रेल्वे पोलिसांनी लष्करी जवानाचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून एका चोराला अटक केली आहे. त्याच्या जवळ असलेल्या चोरीच्या दागिन्यांसह १ लाख ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जहीर हयातसाब मुल्ला (वय ३२, रा. नेकारनगर, मेन रोड, हुबळी) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जवान यतींद्रकुमार पूरणसिंग (वय ३३, मूळचे राहणार कुमारिया, ता. बिसावार, जि. हाथरस, उत्तरप्रदेश) हे १४ एप्रिल रोजी निजामुद्दीन-वास्को स्पेशल एक्स्प्रेस रेल्वेने सहकुटुंब आग्य्राहून बेळगावला येत होते. १५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारे रेल्वे कुडची (बेळगाव) रेल्वेस्थानकावर पोहोचली, त्यावेळी या जवानाजवळील दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
यतींद्रकुमार यांच्याजवळील ६ ग्रॅमची चेन, प्रत्येकी ३ ग्रॅमच्या दोन अंगठ्या असे ४० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी जहीरला अटक करून त्याच्या जवळून ५७ ग्रॅमचे दागिने व एक होंडा शाईन दुचाकी असा एकूण १ लाख ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
रेल्वेच्या पोलीस उपअधीक्षिका पुष्पलता व मंडल पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्याप्पा मुक्कण्णावर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नटराज टी., हवालदार बी. बी. बंडीवड्डर, संगाप्पा कोटय़ाळ, मलिकसाब मुल्ला, शंकरानंद पुजारी, आरपीएफचे एएसआय संगमेश, के. एच. खतीब आदींनी ही कारवाई केली आहे.