देसूर येथील रेल्वे फाटक नेहमीच वादात अडकलेले आहे, कधी ते लवकर उघडत नाही तर कधी फाटकामध्ये बिघाड होत असतो. आता यामध्ये येथील अरुंद अंडरग्राउंड ब्रीजची भर पडली असून हा ब्रिज वाहनचालकांना मनस्ताप देणारा ठरत आहे.
देसूर येथील रेल्वे फाटक नेहमीच वादात अडकलेले आहे, कधी लवकर उघडत नाही तर कधी गेटमध्ये बिघाड होत असतो. यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सोसावा लागतो. अशातच आता रेल्वे खात्याने या ठिकाणी अंडरग्राउंड ब्रिज तयार असून तो वाहतुकीस खुलाही झाला आहे. परंतु हा ब्रिज अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
नवीन तयार केलेल्या ब्रिज खालून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास फार मोठी समस्या उद्भवत आहे. हा ब्रिज एकदम अरुंद झाल्यामुळे मोठ्या वाहनांना वाहने वळविताना खूप अडचण येत आहे. ट्रक वगैरे सारखी मोठी वाहने या ब्रिज खाली आल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 मिनिटे वाहने वळविण्यासाठीच लागत आहेत.
अवजड वाहने वळविण्यास वेळ लागत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र या ठिकाणी वारंवार पहावयास मिळत आहे. वाहनांची मोठी गर्दी होत असल्यामुळे हा ब्रिज सध्या नागरिकांसाठी तर कुचकामीच बनला आहे. या परिसरातील राजहंसगड, देसुर, नंदिहळ्ळी, खानापूर आदी भागातील वाहने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये -जा करतात. तसेच दूध वाहतूक, पेट्रोल व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी देखील मोठ्या प्रमाणात असते.
या सर्व वाहनांच्या चालकांना देसूर रेल्वे फाटक येथील अरुंद अंडरग्राउंड ब्रिजमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूने वाहने आल्यास गंभीर समस्या उद्भवत आहे. तरी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकालात काढावी अशी सर्वसामान्य वाहनचालकांची मागणी आहे.