बेळगाव पोलीस विभागात कोविड नियंत्रणासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या एडीजीपी आयपीएस अधिकारी भास्कर राव आज बेळगावमध्ये दाखल झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी भेट देऊन कोविड संदर्भात जनजागृती केली. आज शहरात सुमारे १५०० मास्कचे वितरण करत कोविड मार्गसूचीचे पालन करण्यासंदर्भात आवाहन केले.
सुरुवातीला अंजुमन संस्थेला भेट देऊन मुस्लिम समाजातील नेत्यांशी चर्चा केली. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड मार्गसूचीचे पालन करून नमाज पठाण करावे, तसेच आपापल्या घरीच नमाज पठाण करावे, कोविड संदर्भातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन करू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
यानंतर विविध चर्चना देखील भास्कर राव यांनी भेट देऊन समाजप्रमुखांशी चर्चा केली. कोविड संदर्भातील आवश्यक त्या सूचना करून कोविड विषयक मार्गसूचीनुसार सर्व नियम पाळण्याविषयी त्यांनी सांगितले. तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठांना अनेक मठाधीशांना तसेच धार्मिक स्थळांना भेट देऊन त्या-त्या समाजाच्या प्रमुखांशी भास्कर राव चर्चा करणार आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले कि, प्रत्येक नागरिकाचा जीव आणि त्याचे जीवन वाचविणे हे आवश्यक आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविणे हेच सध्याचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे. परराज्यातून कोणालाही कर्नाटकात येण्यासाठी बंदी नाही. परंतु यासाठी प्रशासनाने काही नियम ठरविले आहेत.
या नियमांची पूर्तता करून कोणालाही प्रवेश घेता येणे शक्य आहे. परंतु नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून चोरवाटेने राज्यात प्रवेश घेऊ नये. सरकार आपला जीव वाचविण्यासाठीच कार्यरत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून आपले कर्तव्य पार पाडावे, आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन भास्कर राव यांनी केले.