कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार बेळगावात आज बुधवार दि. 22 एप्रिलपासून येत्या दि. 4 मे 2021 पर्यंत लॉक डाऊन 2.0 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित आस्थापने वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. बेळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठेत आज दुपारी पोलिसांनी या मिनी लॉकडाउनच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला, मात्र तो करताना जबरदस्ती आणि दंडेलशाही केल्यामुळे बाजारपेठेत खळबळ उडवून संतापाची लाट पसरली.
राज्यात नाईट कर्फ्यू व विकेंड लॉक डाऊन जाहीर केलेल्या राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार पर्यंत मिनी लॉक डाऊन लागू केला आहे. काल रात्री राज्याचे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी याबाबतचा आदेश बजावला आहे. या आदेशाची आजपासून प्रशासनाने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आता रोज केवळ रात्री 9 वाजल्यापासून निर्बंध लागू होणार शनिवार व रविवार कडक संचार बंदी असणार. सोमवार ते शुक्रवार नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार असा व्यापाऱ्यांचा समज झाला होता.
परंतु राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची संबंधित आस्थापने सुरू राहणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे मिनी लॉक डाऊन लागू असणार आहे, याची बहुतांश व्यापाऱ्यांना कल्पनाच नव्हती. त्यामुळे आज दुपारी दिडच्या सुमारास कोणतीही पूर्व सूचना अथवा कल्पनाच न देता पोलिसांकडून शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली आदी परिसरातील सर्व व्यवहार जबरदस्तीने बंद करण्याची मोहीम सुरु होताच व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
शहरातील बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असताना मिनी लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी दंडेलशाही सुरू केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडवून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. कांही व्यापाऱ्यांनी सदर कारवाईबद्दल आक्षेप घेऊन बाजारपेठेतील व्यवहार बंद करायचे होते तर त्याची पूर्वकल्पना आम्हाला का दिले गेले नाही? असा जाब पोलीस अधिकाऱ्यांना विचारला. तेंव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी आम्ही फक्त आदेशाची अंमलबजावणी करीत आहोत असे सांगून आपली कारवाई जारी ठेवली. यावेळी पोलिस अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
नव्या आदेशानुसार मिनी लॉक डाऊन काळात सर्व शाळा व महाविद्यालये तसेच शिक्षण संस्था बंद असणार आहेत. थिएटर, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, योगा सेंटर आदी बंद राहतील. सर्व राजकीय, धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम या काळात बंद असणार आहेत. हॉटेल व रेस्टॉरंट सुरू असतील, पण तेथे ग्राहकांना प्रवेश असणार नाही. तेथून केवळ खाद्यपदार्थांचे पार्सल नेता येणार आहे. बांधकामाशी संबंधित सर्व कामे व अस्थापणे सुरू असणार आहेत. सर्व औद्योगिक आस्थापने सुरू राहतील. मात्र प्रत्येक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन अनिवार्य असणार आहे.