बेळगाव लोकसभेसाठी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कित्तेक वर्षांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार दिला आहे. युवा समितीचे नेतृत्व करणारे शुभम शेळके आता उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरत आहेत.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर आता शुभम शेळके यांच्या प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे. समितीच्या लढ्याच्या इतिहासात एक नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
शुभम शेळके हे युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत. युवकांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षात जाणारी तरुण पिढी त्यांनी समितीकडे आणि सीमाप्रश्नाकडे वळवली आहे. मराठी म्हणून जगताना स्वाभिमान बाळगा, कन्नड च्या विरोधात नाही पण मराठी असल्याचा अभिमान ठेवा हे विचार तरुणांमध्ये रुजविण्यात शुभम शेळके यशस्वी ठरले. त्यांचे नाव समस्त युवा वर्गातून पुढे आले. आता त्यांच्या प्रचाराची धुरा युवकांनीच हाती घेतली आहे.यामुळे मराठी म्हणून जो कोणी या मतदारसंघात आहे त्याचे मत शुभम यांना पडावे हे एकमेव ध्येय आता युवकांनी बाळगले आहे.
शुक्रवारी रात्री सर्वात आधी शिवसेनेने शुभम शेळके यांना पाठिंबा दिला त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शेळके यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. नाव अधिकृत जाहीर होताच युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करत आशीर्वाद घेतला भगव्या ध्वजाला मानवंदना दिली.
गेल्या कित्येक महिन्या पासून मराठी भाषा संस्कृती साठी लढणार, भगव्या साठी आग्रही असणारे युवा नेतृत्व आता लोकसभेसाठी उभे ठाकले आहे शुभमच्या यशात बेळगावसह सीमा भागातील मराठी माणसाचे यश दडले यासाठी युवक देखील जोमाने कामाला लागले आहे.
कोणताही लढा किंवा आंदोलन युवकांनी हातात घेतल्यास ते यशस्वी होते हा इतिहास आहे लढा युवकांनी हाती घेतल्याने फ्रेंच मध्ये राज्यक्रांती घडली होती महाराष्ट्र एकीकरण समितीत देखील शुभम शेळके यांच्या रूपाने समितीला एक नवे नेतृत्व मिळाले आहे. नवी आशा, नवी दिशा घेऊन लढ्याची यापुढील वाटचाल सुरू राहणार आहे.