कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धार्मिक मेळावे, समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार विवाह सोहळ्यांना १०० जणांना तर अंत्यसंस्काराला २५ जणांना परवानगी दिली आहे. धार्मिक कार्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मेळाव्यात एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
जर विवाह सोहळा खुल्या ठिकाणी असेल तर यासाठी २०० लोकांचीच मर्यादा आहे. तर हॉल किंवा बंदिस्त ठिकाणी विवाहाला १०० लोकांची मर्यादा असेल. खुल्या जागेत वाढदिवसाला ५०, हॉलमध्ये २५ जणांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त ५० लोकांना अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्याची परवानगी आहे. शोकसभेसाठीही नवे नियम तयार करण्यात आहेत. खुल्या जागेत ५० तर बंदिस्त जागेत २५ जणांना उपस्थित राहता येईल. इतर कार्यक्रमांमध्ये ५० लोकांपेक्षा जास्त लोकांचा सहभाग नसावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
मार्च महिन्यात आरोग्य विभागाने एक नियमावली जाहीर केली होती. त्यात खुल्या जागेतील लग्न समारंभासाठी ५०० जणांना उपस्थित राहण्याची मुभा दिली होती. लग्न समारंभाला परवानगी देताना तशी अट घातली जात होती, पण आता ५०० ऐवजी २०० जणांनाच उपस्थित राहण्याची मुभा मिळणार आहे. त्यामुळे लग्न समारंभांवर निर्बंध येणार आहेत.
सरकारचे मुख्य सचिव आणि कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष पी. रविकुमार यांच्या म्हणण्यानुसार २०० लोकांना राजकीय सभेसाठी परनवागी देण्यात आली आहे. धार्मिक उत्सवांवर बंदी घातली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील पोटनिवडणुकांचा जाहीर प्रचार गुरुवारी संपल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.