कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील आमदार बसनगौडा पाटील हे सातत्याने टीका करतात. बसनगौडा पाटील – यत्नाळ यांना यासाठी हायकमांडने करणे दाखवा नोटीस देखील बजावली आली. त्यांच्या सततच्या टीकांवर प्रत्त्युत्तर देत मंत्री मुरुगेश निराणी यांनी आज त्यांचा खरपूस समाचार घेतला.
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी बसनगौडा पाटील – यत्नाळ यांचे नाव न घेता त्यांना शालजोडीचा आहेर दिला. ‘विजापूरचा नालायक’ व्यक्ती आमच्या पक्षाला बदनाम करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य देखील मुरुगेश निराणी यांनी केले आहे.
आपल्याच पक्षात राहून आपल्याच पक्षावर सातत्याने बोट दाखवून टीका करणे, आपल्या पक्षाचे चिन्ह गळ्यात घालून, आपल्याच घरात बसून पक्षावर आगपाखड करणे, पक्षाच्यावतीने आपल्यावर अन्याय होत आहे, असा टाहो फोडणे ही सर्व कारस्थाने एखाद्या देश्द्रोह्याप्रमाणे असल्याची टीका मुरुगेश निराणी यांनी बसनगौडा पाटील – यत्नाळ यांच्यावर केली आहे.
शिवाय टीकाच करायची असेल तर आधी राजीनामा द्यावा, असा सल्लाही मुरुगेश निराणी यांनी दिला. मुरुगेश निराणी पत्रकारांशी बोलताना बसनगौडा पाटील – यत्नाळ यांच्यावर इतके भडकले की यादरम्यान त्यांनी यत्नाळांना एकवचनी संबोधित केले. दरम्यान उमेश कत्ती देखील यावेळी उपस्थित होते. मुरुगेश निराणी यांच्या भडकलेल्या स्वराला आवरते घेण्याचा सल्ला देऊन उमेश कत्ती यांनी त्यांना शांत केले.