1967 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला सिंह हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा श्वास असे समीकरण झाले होते. आजही याचा प्रत्यय येत आहे.
2021 मध्ये होणाऱ्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराला ‘सिंह’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा समिती इतिहासाला उजाळा मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्नी चळवळ सुरू केली. त्यावेळच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला भरघोस पाठिंबा मिळाला. आणि समितीचा विजयही झाला. त्यावेळी कट्टर मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी स्वतःलाच समितीचा उमेदवार समजून जोरदार प्रचार केला.
दरम्यान त्यावेळी समितीला मिळालेल्या चिन्हामुळे ‘सिंह समिती सायनाक’ हे ब्रीद प्रत्येक मराठी भाषिक आबालवृद्धाच्या ओठावर रुळले होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठी भाषिक जनतेने स्वखर्चांने आणि स्वयंस्फूर्तीने सीमाभागातील भिंती उमेदवाराच्या प्रचारार्थ रंगवल्या. त्याच्या खुणा आजही अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहेत.
हलगा, होसुर – बसवाण गल्ली यासारख्या अनेक गल्ल्यांच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेली चित्रे आजही आपल्याला पहावयास मिळतात. सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची तळमळ आजही तितकीच ज्वलंत असल्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. सध्याच्या लोकसभा निवडणुकीतदेखील या साऱ्या गोष्टी पुन्हा होत असल्यामुळे समितीला गतवैभव प्राप्त होईल याची खात्री पटत आहे. लोकसभा निवडणूक लढविणारे समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांनाही तालुक्यासह संपूर्ण सीमाभागाचे असेच पाठबळ मिळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत समितीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही मराठी भाषिकातून व्यक्त होत आहे.
समितीचे निष्ठावान कार्यकर्ते महादेव पाटील यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने संपर्क साधला. यावेळी त्यांनी 1967 सालच्या समितीच्या आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन आमदार कै. बळवंतराव सायनाक हे विधानसभा निवडणूक लढवीत होते. त्यांना सिंह हेच चिन्ह देण्यात आले होते. यावेळी असंख्य मराठी भाषिकांनी स्वयंस्फूर्तीने आणि स्वयंप्रेरणेने समितीचा यथाशक्ती प्रचार केला. स्वतःला समीतीचा उमेदवार समजून प्रत्येकाने कार्य केले.
कै. नारायण सुतार या समितिनिष्ठ कार्यकर्त्याने समितीच्या प्रचारासाठी एक नवी कल्पना सुचविली. सीमाभागातील प्रत्येक गल्लोगल्ली, भिंतीवर घरावर समितीच्या प्रचारार्थ समितीचे चिन्ह रेखाटण्याचे ठरले. आणि रातोरात सिंह या चिन्हाचा साचा नारायण सुतार यांनी तयार केला. साचा बनवून तयार झाल्यावर असंख्य कार्यकर्त्यांनी चुना आणि निळीच्या सहाय्याने गल्लोगल्ली भिंतींवर सिंह रेखाटला. हा प्रचार इतका गाजला की, या निवडणुकीत समिती भरघोस मतांनी विजयी झाली. 2021 साली देखील जवळपास असेच चित्र दिसून येत असून, या निवडणुकीत समितीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास महादेव पाटील यांनी व्यक्त केला.