बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समिती युतीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बेळगावात दाखल झालेले महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या गाडीचे इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेले सारथ्य आज सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला.
महाभारताच्या युद्धात ज्याप्रमाणे कृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले, त्याप्रमाणे बेळगावातील संपूर्ण प्रचार दौऱ्यादरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या गाडीचे सारथ्य केले. याची सुरुवात आज दुपारी बेळगाव विमानतळापासून झाली. बेळगाव विमानतळापासूनच खासदार माने यांनी खासदार राऊत यांच्या कार गाडीचा ताबा आपल्याकडे घेतला. विमानतळापासून ते हॉटेल मेरियटपर्यंत त्यानंतर हॉटेल मॅरियटपासून रामलिंगवाडी आणि रामलिंगवाडीपासून शिवाजी उद्यानापर्यंत तसेच शिवाजी उद्यानापासून शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौकापर्यंत खासदार धैर्यशील माने यांनी मोठ्या सफाईने खासदार संजय राऊत यांची गाडी चालविली.
शिवाजी उद्यानापासून संयुक्त महाराष्ट्र चौकापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये हजारो मराठी भाषिकांचा सहभाग होता. परिणामी मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी आणि दाटीवाटी झाली होती. तथापि अशा परिस्थितीत देखील आपले चालक कौशल्य सिद्ध करताना खासदार धैर्यशील माने यांनी अतिशय सफाईदारपणे गर्दीतून वाट काढत खासदार संजय राऊत यांना अलगदपणे सभास्थळी पोहोचविले.
या पद्धतीने खासदार धैर्यशील माने यांनी खासदार संजय राऊत यांच्या गाडीचे केलेले सारथ्य कौतुकाचा विषय झाला होता. कांहीजण याला महाभारतातील कृष्णाने केलेल्या अर्जुनाच्या रथाच्या सारथ्यची उपमा देताना दिसत होते.